नाशिक : सातपूर गोळीबार प्रकरण… एका बंगल्यावर ताबा.. महिलांवरील अत्याचार अशा वेगवेगळ्या प्रकरणातून लोंढे पिता- पुत्रांचे कारस्थाने समोर येत असतांना शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लोंढे यांच्या पी. एल. ग्रुपवर मकोका कारवाई केली. लोंढे टोळीविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणात अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष वाघ (४६) हे रिक्षाचालक असून त्र्यंबकरोडवरील उत्कर्ष नगरात राहतात. त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन बळकाविण्यासाठी संशयित बांधकाम व्यावसायिक ईश्वरभाई मावाणी (रा. विधाते नगर), प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढे , दीपक मटाले (रा. कामटवाडे) आणि गणेश चव्हाण यांनी संगनमताने बनावट दस्ताऐवज तयार केले. संशयितांनी सुरेश वाघ यांची संमती न घेता त्यांची त्र्यंबकेश्वर परिसरातील महिरावणी येथील वडिलोपार्जित शेतजमिनीचा ताबा घेतला. त्यानंतर वाघ यांना महात्मा नगर येथील हॉटेल राधिकाजवळ बोलावले. ताब्यात घेतलेली जमीन परत देण्यासाठी आणि न्यायालयीन दिवाणी दावा परत घेण्याकरता ७५ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. संशयितांनी वाघ यांच्याकडून २० हजार रुपये बळजबरीने घेतले.
याप्रकरणी, गंगापूर पोलीस ठाण्यात प्रकाश लोंढेसह बांधकाम व्यावसायिक ईश्वरभाई मावानी आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील ईश्वरभाई आणि दीपक मटाले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. भूषण लोंढे अजूनही फरार आहे. संशयित प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे हे न्यायालयीन कोठडीत असल्याने गंगापूर पोलीस कारागृह प्रशासनाशी चर्चा करुनत त्यांचा ताबा घेतील.
नाशिकच्या गुन्हेगारीचा आलेख उंचावणारे राजकीय पदाधिकारी
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पोलिसांबरोबर लोकप्रतिनिधींची जबाबदारी असतांना गुन्हेगारांनाच त्यांच्याकडून पाठबळ दिले जात असेल तर गुन्हेगारीचा आलेख उंचावणारच. नाशिक शहरात जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत हत्यासत्र सुरु राहिले. यामध्ये कोष्टी, पगारे , टिप्पर अशा वेगवेगळ्या टोळ्यांचा उल्लेख होतो. पी. एल. गँगही चर्चेत राहिली. सातपूर गोळीबार प्रकरणात पी. एल. गँगचा प्रमुख तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे सहआरोपी झाला. अशाच एका प्रकरणात मामा राजवाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला. यानंतर भारतीय जनता पक्षाशी संबंधित अजय बागूलचे नाव उघड झाले. मुकेश शहाणे याचीही चौकशी झाली.
