नाशिक : उन्हाळी सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा सोमवारी झाला. काहींना नवीन सवंगडी मिळाले. वर्गात गेल्यावर आई-बाबांचा हात सुटला म्हणून काही रडवेले झाले. वर्गात शिक्षक तसेच बाहेर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेली कोंडी तोडत काही बहाद्दर बाहेरही पडले. या सावळ्या गोंधळात नव्या वर्षाचा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. बहुसंख्य शाळामध्ये प्रवेशोत्सवाच्या ठिकाणी मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांवर अधिक ताण दिसून आला.

नाशिक शहर परिसरातील विद्यालयांमध्ये प्रवेशोत्सव सोहळा रंगला. प्रथमच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची आवारातच सुरु असलेली रडारड, गोंधळ असे वातावरण होते. या बालकांना आवरतांना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले. अभिनव बाल विकास मंदिर शाळेत मधमाशांचे चित्र तयार करण्यात आले होते. त्या ठिकाणी मुलांचे सेल्फी काढण्यात आले. रचना शाळेत दुसरी-तिसरीच्या विद्यार्थ्यांनी संत, राष्ट्रपुरूषांची वेशभुषा केली. शाळेच्या आवारात आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी पाटा, वरवंटा, सुप, जाते आदी साहित्य ठेवण्यात आले होते. बालकांच्या स्वागतासाठी खास वासुदेव आला होता. धनलक्ष्मी शाळेत बालकांचे स्वागत तुळशीचे रोप देऊन करण्यात आले. काही ठिकाणी बालकांसाठी कार्टुनचे कटआऊट लावण्यात आले होते.. लेझीमच्या तालावर, बैलगाडीवर बसवून बालकांना शाळेत आणण्यात आले. सर्वशिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरणही करण्यात आले.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बागलाण तालुक्यातील तुंगणदिगर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ही शाळा आदिवासी भागातील असून शाळेची पटसंख्या ७२ आहे. गावातील एकही विद्यार्थी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत जात नाही. उत्तम शैक्षणिक गुणवत्ता हे शाळेचे वैशिष्ट्ये आहे. येथील विद्यार्थी सातवीनंतर संभाजीनगर सैनिकी शाळेत प्रवेश घेतात. विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यानंतर भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेसाठी इमारत, क्रीडांगण देण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेनुसार शंभर वृक्षांचे रोपण शाळेच्या आवारात करण्यात आले. दुपारच्या वेळी विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. भुसे यांनी विद्यार्थ्यांना जेवण वाढले. आदिवासी शिक्षण मंत्री डॉ. अशोक उईके यांनी इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव आश्रमशाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवसाचा उत्साह शहरासह जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये दिसून आला. प्रत्येक शाळेने वेगवेगळ्या पध्दतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. पहिला दिवस आनंदी जावा, यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून पुरेपूर प्रयत्न करण्यात आले होते.