नाशिक : सातत्याने सुरू असलेल्या पावसात शहरात विविध आजारांनी डोके वर काढले असताना गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूचा प्रादुर्भाव मात्र यंदा कमी आहे. मागील वर्षी जूनमध्ये डेंग्यूचा उद्रेक झाल्याची स्थिती होती. तेव्हा एकाच महिन्यात डेंग्यूचे १६५ बाधित रुग्ण आढळले होते. चालू वर्षी जूनमध्ये ही संख्या २५ रुग्णांवर आल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाला सुरुवात झाली. मागील दीड महिन्यांपासून काही अपवाद वगळता त्याने विश्रांती घेतलेली नाही.
वातावरण सातत्याने बदलत असल्याने आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. अनेक भागात पावसाचे साचणारे पाणी डासांच्या प्रादुर्भावाचे कारण ठरत आहे. सर्दी, घसा दुखणे, थंडी-ताप, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ असे विकार बळावल्याचे चित्र आहे. डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यूंचा उद्रेक होतो. मागील वर्षी जूनमध्ये तशीच परिस्थिती होती. यंदा सुरुवातीपासून धूर फवारणी व तत्सम उपायांमुळे ही संख्या तूर्तास नियंत्रणात राहिल्याचे दिसून येते.
तुलनात्मक स्थिती
मागील वर्षी जूनमध्ये ५४२ संशयिताच्या नमुना तपासणीअंती १६५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यावर्षी आतापर्यंत ३४६ संशयितांचे नमुने तपासण्यात आले. यातील २५ जण डेंग्यूबाधित असल्याचे निष्पन्न झाले. २०२४ मध्ये जानेवारी ते मे या कालावधीत डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या १०४ होती. जूनमध्ये ती मोठ्या प्रमाणात वाढली.
त्या वर्षात डेंग्यूचे एकूण ११७२ रुग्ण आढळले होते. एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. चालू वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात डेंग्यूबाधितांची संख्या १४७ असल्याचे अहवालात म्हटले आहे. एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. या वर्षी आतापर्यंत १६३७ नमुने तपासण्यात आले आहेत.