शासन, सार्वजनिक आणि खासगी भागीदारी या त्रिसूत्रीवर नाशिकचा विकास शक्य असल्याचे ‘मी नाशिककर’च्या वतीने जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आलेल्या भविष्यकालीन आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा विकास आराखड्यासाठी जिल्ह्यातील संस्था व आस्थापनांनी ३१ मेपर्यंत आपले अभिप्राय नोंदवावेत, असे काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांनी सूचित केले होते. त्यास प्रतिसाद देत मी नाशिककरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोठेकर आणि माध्यम व जनसंपर्क तज्ज्ञ डॉ. अभिजित चांदे यांनी हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त केला. मोठे उद्योग नाशिकमध्ये आल्यास समग्र विकास होऊन अर्थकारण व रोजगार यावर सकारात्मक परिणाम होतील. यासाठी नाशिकच्या विविध २६ व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांमधील २०० हून अधिक उद्योजक, व्यावसायिक ‘मी नाशिककर’ या अराजकीय चळवळीशी जोडले आहेत.

हेही वाचा >>> अवाजवी घरपट्टीने धुळेकर हैराण; भाजप उपमहापौरांचा घरचा आहेर

२०१७ मध्ये उद्योजक पियुष सोमाणी, उमेश वानखेडे, मनिष रावल, किरण चव्हाण व संजय कोठेकर यांनी या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली होती. जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांना सादर केलेल्या आराखड्यात नाशिकच्या विकासासाठी शासन- सार्वजनिक-खासगी भागीदारी या त्रिसूत्रीनुसार विकास व्हावा, असे सुचविण्यात आले आहे. शासकीय उपक्रमात औद्योगिक वसाहतीत १० एकर क्षेत्रात आयटी पार्कची उभारणी, वसाहतीतील राखीव भूखंडावर मोठ्या उद्योगांना आमंत्रण, मनपा हद्दीतील ३५ किलोमीटर वळण रस्त्यांचे रुंदीकरण आणि एनएमआरडीए ६० किलोमीटरचा विकास आराखडा, शैक्षणिक केंद्रासाठी खासगी बहुराष्ट्रीय विद्यापीठ व शासकीय एनआयटी संस्था, मोठे उद्योग स्थापनेत सहजता येण्यासाठी एक खिडकी योजना याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

हेही वाचा >>> जळगाव: सिलिंडर स्फोटात तीन घरांचे नुकसान; संसारोपयोगी साहित्य खाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्वजनिक उपक्रमात पर्यावरस्नेही पर्यटन, हवाई वाहतूक संपर्क, कृषिमाल निर्यात व वाइन पर्यटन, धार्मिक पर्यटन, चित्रपट नगरीची उभारणी, वैद्यकीय पर्यटन व वादमुक्त औद्योगिक क्षेत्र यांची गरज मांडली गेली आहे. चेन्नई-सूरत आणि नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला जोडणारे दोन नवीन मार्ग, ड्राय पोर्ट, मुंबई विमानतळावरील विमानांची स्थानिक पातळीवर देखभाल दुरुस्ती आदी पुरक उपक्रमांकडे लक्ष वेधण्यात आले. या माध्यमातून शाश्वत रोजगार, विक्रीच्या क्षमतेत वाढ, प्रतिभा स्थलांतर रोखणे, गुंतवणूक वाढवून आर्थिक विकास साधता येईल, असा विश्वास मी नाशिककरने व्यक्त केला आहे.