मालेगाव : नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर झाला असून एकाच दिवसात जिल्ह्यातील ११७ पैकी तब्बल ९८ महसूल मंडळांमध्ये पावसाने दाणादाण उडवून दिल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासात जवळपास संपूर्ण जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा सहन करावा लागला आहे. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

यंदाच्या खरीप हंगामापूर्वी नाशिक जिल्ह्यात मे महिन्यात अनेक ठिकाणी बेमोसमी पावसाने झोडपून काढले होते. या पावसामुळे काही ठिकाणी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नद्या,नाल्यांना काही प्रमाणात पाणी आले होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण फारसे समाधानकारक नव्हते. दरम्यानच्या काळात जवळपास एक ते सव्वा महिना पावसाने ओढ दिली. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या. पावसाअभावी पिके करपू लागल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीव भांड्यात पडला होता. जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये पर्जन्याची स्थिती यथा-तथा असताना ठराविक गावांना मात्र ऑगस्ट महिन्यात देखील अतिवृष्टी झाली.ऑगस्ट महिन्यातील या अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात ४० गावांमध्ये ४०१४.३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते, ज्यात ७ हजार १०८ शेतकरी बाधित झाले होते.

गेल्या २२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुन्हा धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. २२ व २३ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे विशेषत: मालेगाव, नांदगाव, सुरगाणा आदी भागातील पिकांना जबर फटका बसला. या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्याला पुन्हा झोडपून काढले. जिल्ह्याच्या बहुतांश भागात रात्रभर संततधार सुरू राहिली. रविवारी देखील अनेक भागात पाऊस बरसत आहे. जिल्ह्याच्या १५ तालुक्यांमध्ये एकूण ११७ महसूल मंडळ आहेत. त्यापैकी तब्बल ९८ महसूल मंडळांमध्ये गेल्या २४ तासात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील नांदगाव, देवळा, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, नाशिक, सुरगाणा या तालुक्यांतील संपूर्ण गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यापैकी मालेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याचे दिसत आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेती पिके पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मका,बाजरी,कांदे,सोयाबीन तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग काळजीत पडला आहे.

नाशिक जिल्ह्यात २४ तासांत तालुकानिहाय अतिवृष्टी झालेली महसूल मंडळे व संबंधित तालुक्यातील एकूण महसूल मंडळांची संख्या पुढीलप्रमाणे. कंसातील आकडे एकूण मंडळांची आहेत. मालेगाव ८(१३), बागलाण ५ (११), कळवण २(६), नांदगाव ८(८), नाशिक ९(९), सुरगाणा ६(६), दिंडोरी ९(९), इगतपुरी ६(६),पेठ ४(४), निफाड १०(११), सिन्नर ८(१२), येवला ७(८), चांदवड ७(८), त्र्यंबकेश्वर ५(५), देवळा ४(४).

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतांमधील पंचनाम्याचे काम ग्रामस्तरीय समितीकडून सुरू झालेले आहे. परंतु रविवारी देखील अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्याने या कामात अडथळा निर्माण झाला आहे. लवकरच संपूर्ण नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले जातील. कुणीच शेतकरी त्यापासून वंचित राहणार नाही. – भगवान गोर्डे (तालुका कृषी अधिकारी मालेगाव)