नाशिक – कधीकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे नाशिक मेच्या प्रारंभीच आणखी तापले आहे. शुक्रवारी उन्हाचे तीव्र चटके आणि प्रचंड उकाड्याने शहरातील उच्चांकी तापमानाचा विक्रम मोडीत निघण्याची धास्ती व्यक्त झाली. दुसरीकडे शनिवार ते मंगळवार या कालावधीत वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या हवामानात मागील काही वर्षात कमालीचे बदल झाले. एप्रिलमध्ये पाऱ्याने ४१ अंशाचा टप्पा ओलांडला होता. मागील महिन्यात अधिक काळ उष्णतेची लाट आल्याची स्थिती होती. मे महिना त्यापेक्षा चटके देणारा ठरण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी पारा उंचावून ४० अंशावर पोहोचला. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३९.९ अंशाची नोंद झाली. सकाळपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. उन्हाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे जनजीवनावर विपरित परिणाम झाल्याचे दिसत होते. उन्हाचे चटके बसत असल्याने दुपारी प्रमुख रस्ते, बाजारपेठेतील वर्दळ ओसरलेली होती. वातावरणात कोरडेपणा होता. दिवसा आणि रात्री कमालीचा उकाडा आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
शनिवार ते मंगळवार या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात तसेच घाटमाथ्यावर वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. एप्रिलमध्ये अवकाळी पावसाचा फटका अनेक भागास बसला होता. त्याची पुनरावृत्ती मेमध्येही होण्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवस ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागात विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.