नाशिक – घर कामगार मंडळाच्या सर्व योजना त्वरित अंमलात आणाव्यात, बांधकाम कामगार मंडळाच्या योजना घर कामगारांना लागू कराव्यात, यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा घरकाम मोलकरीण संघटनेच्यावतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जाहीर झालेले २१०० रुपये मासिक अर्थसहाय्य कधी मिळणार, असा प्रश्न मोर्चेकरी महिलांनी केला. तसेच घर कामगारांना माणूस म्हणून विश्रांतीचा अधिकार असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला.
आयटक संलग्न जिल्हा घरकाम मोलकरीण संघटनेचे कार्याध्यक्ष राजू देसले, शहराध्यक्ष मोना आढाव, उपाध्यक्ष मीनाक्षी डोंगरे, सचिव प्राजक्ता कापडणे आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात संघटनेच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. नंतर शिष्टमंडळाने कामगार आणि महिला बालविकास मंत्र्याच्या नावाने जिल्हा प्रशासन, कामगार उपायुक्त यांना निवेदन दिले.
राज्यात लाखो घरकामगार महिला पहाटेपासून रात्रीपर्यंत दुसऱ्यांच्या घरात काम करतात. इतरांचे घर नीटनेटके ठेवतात. कोणाचे स्वयंपाक घर सजवतात. कोणाचे मूल सांभाळतात. पण त्यांच्या आयुष्यात मात्र कायम असुरक्षित, अस्थिरता आणि असमानता असल्याचा मुद्दा मोर्चेकऱ्यांनी मांडला. समाजाला स्वच्छ, सुंदर, सुस्थितीत ठेवणाऱ्या कामगार महिलांचे स्वत:चे जीवन मात्र संघर्षांनी व्यापलेले आहे. त्यांना सुट्टी नाही. ठराविक पगार नाही. आजारी पडल्या तर कोणी विचारत माही, वय झाले की कोणी विचारपूस करीत नाही, याकडे महिलांनी लक्ष वेधले.
शासनाने घर कामगार मंडळ स्थापन केले असले तरी त्याचे अस्तित्व केवळ कागदावर आहे. पुरेशा निधीची तरतूद नाही. स्वतंत्र कर्मचारी, अधिकारी नाहीत. ना सर्व योजना कार्यान्वित झाल्या, ना घरकामगारांना त्याचा थेट फायदा मिळतो. विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनाही बंद असल्याची तक्रार करण्यात आली. सामाजिक सुरक्षा, निवृत्तीवेतन, आरोग्य विमा, शिष्यवृत्ती लागू करावी, घर कामगारांसाठी घरकुल योजना राबविणे, घऱ कामगार कल्याण मंडळासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली. सर्व क्षेत्रात आठवड्याची सुट्टी असते. पण घर कामगार मात्र सात दिवस सतत काम करतात. हा अन्याय थांबवून एक दिवसाची पगारी सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी मोलकरीण संघटनेकडून करण्यात आली.