नाशिक – अभिनंदन, तुमची गुंतवलेली रक्कम दुप्पट झाली. ही रक्कम खात्यातून काढण्यासाठी तुम्हाला कर भरावा लागेल, असे समोरुन सांगताच सावध झालेल्या नागरिकाने तत्काळ नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांशी संवाद साधला. त्यामुळे तक्रारदाराने ऑनलाईन गुंतवलेल्या ३६ पैकी २० लाख १५ हजार ८७४ रुपये तत्काळ थांबविण्यात नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांच्या गोल्डन अवर या संकल्पनेमुळे यश आले.
दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथील तक्रारदारास शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सायबर भामट्याकडून सांगण्यात आले. या माध्यमातून अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. त्यास बळी पडत तक्रारदाराने बँक खात्यातून ३६ लाख रुपये भरले. सायबर भामट्यांनी सांगितलेल्या ॲपमध्ये तक्रारदाराने भरलेल्या रकमेची दुप्पट रक्कमही जमा झाली. तक्रारदाराने ती रक्कम खात्यातून काढण्याचा प्रयत्न केला असता, तुम्हाला ही रक्कम काढण्यासाठी काही कर भरावा लागेल. त्यासाठी तुम्हाला अजून पैसे भरावे लागतील, असे सांगण्यात आले.
यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सायबर पोलीस विभागाचे अपर अधीक्षकांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रमोद जाधव यांनी सायबर क्राईम पोर्टलवर तक्रारदाराने दिलेल्या पैशांची माहिती घेत तक्रार नोंदवली. तक्रार नोंदविल्यानंतर लगेच तक्रारदाराचे २० लाख १५ हजार ८७४ रुपये गोठविण्यात आले.
अनोळखी दूरध्वनी क्रमांकावर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती दूरध्वनीद्वारे विचारत नाही. बँक खात्याविषयी माहितीसाठी संबंधित बँकेच्या शाखेत जावून खात्री करावी. तसेच दूरध्वनीवर पाठविण्यात आलेल्या अनोळखी लिंकवर माहिती नसल्यास ती उघडू नये. आपल्या बरोबर अशी कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास जवळील पोलीस ठाणे किंवा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. ऑनलाईन तक्रारीसाठी १९३०, १९४५, १४४०७ या किंवा सायबर पोलीस ठाणे ०२५३- २२००४०८, ७६६६३१२११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रारदार हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या ओळखीचे, मित्र परिवाराकडून काही रक्कम उसनी घेतली. समाजमाध्यमातून शेअर बाजाराविषयी माहिती देणारा एक संदेश त्यांना आला. त्यांनी दिलेली लिंक उघडली असता संशयितांनी आभासी खाते तयार करत त्यांची फसवणूक सुरू केली. अशा प्रकारात संशयितांच्या लक्षात आले की, समोरचा सावध होत आहे. तेव्हा ते ॲप काढून टाकतात. या प्रकारात तक्रारदाराला लक्षात आले. आपली फसवणूक झाली. त्याने तत्काळ ७६६६३१२११२ या क्रमांकावर संपर्क साधला. सायबर विभागाने तातडीने तपासाची सुत्रे हलवत ती रक्कम गोठवली. – नागेश मोहिते, पोलीस निरीक्षक, नाशिक ग्रामीण सायबर विभाग