नाशिक : नाशिक रोडवरील गांधीनगर बस थांब्यालगत भरधाव बसखाली दोन दुचाकी सापडून दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेसह पुरुषाचा समावेश आहे.
राज्य परिवहन महामंडळाची अर्नाळा-नाशिक-शिर्डी बस दुपारी स्थानकातून निघाली. द्वारकाकडून ती नाशिकरोडकडे जात असताना गांधीनगर बस थांब्याजवळ दुचाकीला बसची धडक बसली. दुचाकीवर सचिन काळे आणि त्यांची पत्नी रुपाली काळे (४२, गोदावरी सोसायटी, नारायण बापूनगर, जेलरोड) हे होते. ते दुचाकीने नाशिकरोडकडे निघाले होते. या अपघातात सचिन काळे रस्त्याच्या पलीकडे तर, त्यांची पत्नी रुपाली या बसखाली सापडल्या. चालकाला ही बाब लक्षात आल्यावर त्याने बस रस्त्याच्या बाजूला नेली.
त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणारा दुचाकीस्वार बसखाली सापडला. या दुचाकीवरील संतोष संसारे (४२, सुंदरबन कॉलनी) हे देखील गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या रुपाली आणि संतोष यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. या अपघातात सचिन काळे किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.