नाशिक – शहरातील सर्वात मोठ्या बाजारपेठेच्या स्वरूपात डोंगरे वसतिगृह मैदानाला विशेष ओळख आहे. या ठिकाणी सातत्याने वेगवेगळे प्रदर्शन, कार्यक्रम, सभा होत असतात. सध्या या मैदानावर गणेश मूर्तींची दुकाने लागली आहेत. परंतु, सतत पडणाऱ्या पावसामुळे येथील मैदानाची दुर्देशा झाली असून भाविक, दुकानदार तसेच वाहनधारकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत आयोजकांकडे सातत्याने मागणी करूनही विक्रेत्यांच्या अडचणी कायम आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डोंगरे वसतिगृह मैदानात गणपती मूर्तींची दुकाने लागली आहेत. या ठिकाणी ३० हून अधिक दुकाने आहेत. ही जागा मध्यवर्ती असल्याने विक्रेत्यांकडून या जागेला प्राधान्य दिले जाते. परंतु, सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे विक्रेते अडचणीच्या फेऱ्यात सापडले आहेत. पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने भाविकांना चालणेही कठीण झाले असून अनेक जण घसरून पडत आहेत. त्यामुळे भक्तांना मूर्ती तसेच सजावटीचे सामान ने-आण करतांना कसरत करावी लागत आहे.
वाहने मैदानापर्यंत आणतांना या ठिकाणी असलेल्या चिखलात वाहने चिखलात अडकत आहेत. चिखल आणि पाण्यामुळे मूर्ती नेणे मोठे संकट ठरत आहे. आयोजकांनी दुकानधारकांकडून मोठी भाडे रक्कम आकारली असली तरी मैदानात कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे भाविकांसह व्यापाऱ्यांमध्येही संताप व्यक्त होत आहे.
याविषयी दुकान मालक दीपक वैद्य यांनी आपले म्हणणे मांडले. दुकानाचे व्यवस्थापन स्वतः करावे लागत आहे. अनेकांनी खास गणेशोत्सवानिमित्त मूर्ती विक्रीसाठी कर्ज काढले असून काहींनी तर पत्नीचे दागिने गहाण ठेवून दुकान उभारले आहेत. अशा वेळी मैदानाची बिकट परिस्थिती आणि सुविधांचा अभाव यामुळे आर्थिक संकट अधिकच तीव्र झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. अशोक कर्पे यांनीही आपली व्यथा मांडली. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असली तरी मैदान चिखलमय झाल्याने चालणेही मुश्किल झाले आहे. आयोजकांचे नियोजन कोलमडल्याने सर्व भार विक्रेत्यांवर आल्याचे त्यांनी सांगितले.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात डोंगरे वसतिगृह मैदानात नाशिक शहर आणि परिसरातील हजारो भाविक मूर्ती खरेदीसाठी गर्दी करतात. त्यामुळे ही बाजारपेठ शहरातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची मानली जाते. परंतु, इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिक येऊनही मैदानात सुविधा नसल्याने भाविक व व्यापारी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने व आयोजकांनी याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भाविक व व्यापाऱ्यांकडून होत आहे.