नाशिक : शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीत कितीही अत्याधुनिक वाद्यांचा दणदणाट असो, कितीही ढोल पथके असोत, सर्वांचे लक्ष गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणेशाकडे असते. या व्यायामशाळेच्या लेझीम आणि ढोल पथकाचे नाशिककरांना कायमच आकर्षण राहिले आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत गुलालवाडी व्यायामशाळेतील अंतर्गत वादामुळे ढोल आणि लेझीम पथकाचा आवाज घुमणार की नाही, याविषयी संभ्रम आहे.

मुंबई, पुणे येथे सार्वजनिक गणेशोत्सवात ढोल ताशांचा आवाज, चित्तथरारक व्यायाम प्रकार यासह वैविध्यपूर्ण संकल्पनांवर काम करण्यात येत असल्याने विसर्जन मिरवणुका नागरिकांच्या लक्षात राहतात. नाशिक सार्वजनिक गणेशोत्सवातही चित्ररथ, ढोल ताशांचा आवाज, शंखध्वनी, ध्वजाच्या हालचालीसह लयबध्द तालीने नाशिककरांना गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची ओढ लागून असते. गुलालवाडी व्यायामशाळेचे लेझीम पथक या मिरवणुकीचे खास आकर्षण असते.

गुलालवाडी व्यायमशाळेचा गणपती मिरवणुकीत तिसरा असतो. या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अगदी पाच वर्षांपासून युवावर्ग, काही वेळा वयोवृध्दही लेझीमच्या तालावर ठेका धरत सामील होतात. राज्यात लोप पावत चाललेली लेझीमची कला पथकाचे प्रशिक्षक बाळासाहेब देशपांडे आजही टिकवून आहेत. साधारणत: गणेशोत्सवाच्या दीड महिनेआधी लेझीमच्या सरावाला सुरूवात होते. सायंकाळी गुलालवाडी व्यायामशाळेत लेझीमचा आवाज आला की अनेक हौशी नाशिककरांची पाऊले व्यायामशाळेकडे सराव पाहण्यासाठी वळतात. गुलालवाडी व्यायामशाळेचे अध्यक्ष म्हणून सतीश शुक्ल काही वर्षांपासून काम पाहत आहेत. लेझीम पथकासह व्यायामशाळेने स्वत:चे ढोलपथकही सुरू केले आहे. लेझीमसह ढोल पथकात साधारणत: २०० हून अधिक जण काम करतात.

दरम्यान, यंदा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असतांनाही व्यायामशाळेच्या लेझीम तसेच ढोल पथकाने सरावाला सुरूवात केलेली नाही. प्रशिक्षक देशपांडे यांनी काही अंतर्गत कारणांमुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत पथक सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले असताना व्यायामशाळेचे अध्यक्ष मात्र लेझीम पथक सहभागी होण्याचा दावा करत असल्याने गणेशप्रेमींमध्ये गुलालवाडीचे पथक मिरवणुकीत सहभागी होणार की नाही, याविषयी चर्चा रंगली आहे.

व्यायामशाळेचे अध्यक्ष आणि काही लोक मनमानी कारभार करत आहेत. व्यायामशाळेची दुरावस्था असतांना निधीचा वापर योग्य ठिकाणी होत नाही. पैशांसाठी अडवणूक करतात. ढोल पथकावर टीका केली जाते. आम्ही प्रामाणिकपणे काम करूनही कामावर शंका घेतली जाते. मिरवणुकीत पदाधिकाऱ्यांचा सहभाग हा केवळ दिखाव्यापुरता असतो. लेझीम पथक तसेच ढोल पथकातील मुले शेवटपर्यंत कार्यरत असतात. यंदाच्या मिरवणुकीत पथक सहभागी होणार नाही. बाळासाहेब देशपांडे (प्रशिक्षक, लेझीम-ढोल पथक, गुलालवाडी व्यायामशाळा)

सध्या पाऊस होत असल्याने मैदान परिसरात चिखल झाल्याने सराव करता येत नाही. सरावासह अन्य गोष्टींवर देशपांडे यांच्याशी काहीही बोलणे झालेले नाही. यंदा मंडळ १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे. लेझीम पथक मिरवणुकीत सहभागी होणार. सतीश शुक्ल (अध्यक्ष, गुलालवाडी व्यायामशाळा)