नाशिक – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्ष येथील महिलेसाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती झाली. आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर मातांसाठी जननी सुरक्षा तसेच जननी शिक्षा सुरक्षा योजना राबवण्यात येत आहे. याव्दारे गरोदर मातांना तसेच प्रसूतीपश्चात आरोग्य सेवा देण्यात येत आहे. या सेवेचा विशेषत: आदिवासीबहुल भागात उपयोग होत असल्याचा दावा यंत्रणेकडून करण्यात येत असला तरी हे दावे फोल असल्याचे उघड होत आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्ष येथील वनिता कडाळी यांना बुधवारी प्रसूती वेदना सुरू झाल्या. नातेवाईकांनी त्वरीत १०२ तसेच १०८ या रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. परंतु, त्यांना अनेक कारणे सांगून रुग्णवाहिका देण्यास नकार देण्यात आला. सरकारी रुग्णालयाच्या पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध झाली. रुग्णवाहिका वनिता यांना घेऊन निघाली असताना त्यांची रस्त्यातच प्रसूती झाली.
आरोग्य विभागाच्या बेफिकिरीचा सामाजिक स्तरावर निषेध नोंदवण्यात येत आहे. एल्गार कष्ट करी संघटनेचे भगवान मधे यांनी या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली. शासनाने माता आणि बाळासाठी मोफत रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिलेली असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. १०८ तसेच १०२ रुग्णवाहिकेसाठी विचारणा केल्यास उद्धटपणे उत्तरे दिली जातात. सेवा नाकारली जाते, अशी तक्रार मधे यांनी केली.
त्र्यंबकेश्वर तालुका आरोग्य अधिकारी मोतीलाल पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. सकाळी रुग्णवाहिकेविषयी विचारणा झाली. मात्र १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. १०२ रुग्णवाहिका ही त्र्यंबकेश्वर रुग्णालयात असते. या अनुषंगाने आदिवासी भागासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी वाहनाच्या माध्यमातून ही सेवा दिली जाते.
१०८ रुग्णवाहिका त्र्यंबकेश्वर आणि हरसुल साठी उपलब्ध आहे. १०२ ही रुग्णवाहिका त्र्यंबकमधील सात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आहे. या घटनेत त्या महिलेला खासगी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पुढे नेण्यात आले. तिच्याबरोबर परिचारिका आणि आशा सेविका होती. मात्र पेगलवाडीनजीक तिला प्रसव वेदना सुरू झाल्याने तिची प्रसूती झाली. तिला मुलगी झाली असून बाळाची व आईची तब्येत सुखरूप असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले.
