नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र-२०२५ च्या दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा २८ जून ते २३ जुलै या कालावधीत राज्यातील १६८ परीक्षा केंद्रावर होणार आहे. यात पदवी, पदव्युत्तर, विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
या टप्प्यात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सर्व वर्षांचे नियमित विद्यार्थी आणि पुनर्परीक्षार्थी तसेच विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. यामध्ये अंदाजे ८० हजार ६५४ विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रविष्ठ होणार आहेत.
हिवाळी- २०२४ टप्पा- चारमधील अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षा केंद्रावर पेपर सुरु होण्याआधी पाठविण्यात आल्या होत्या. तसेच ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करुन तपासण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणेच उन्हाळी-२०२५ टप्पा – दोन परीक्षेच्या अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येतील, असे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी नमूद केले.
या अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने सर्व परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर उपस्थित रहावे. म्हणजे सकाळ सत्रासाठी सकाळी नऊ वाजता तर दुपारच्या सत्रासाठी दुपारी एक वाजता परीक्षा केंद्रावर यावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
लेखी परीक्षांचे अभ्यासक्रम
पदवी अभ्यासक्रमातील सर्व वर्षांचे नियमित आणि पुनर्परीक्षार्थी. बीडीएस, बीएएमएस, बीयुएमएस, बीएचएमएस, नर्सिंग आदींसह पदव्युत्तर अभ्यासक्रमात एमडीएस, डेनिस्ट्री, आयुर्वेद व युनानी, आयुर्वेद पदविका, एमएस्सी-नर्सिग आदी अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा होतील. तसेच विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या एमपीएच, एमपीएच (एन), एमबीए, एम फिल, बी. ऑप्टोमेट्री, पॅरामेडिकल पदविका, सीसीएमपी, एएमएसपीसी, पीजी डीएमएलटी, बीपीएमटी, एमएस्सी फार्मास्युटिकलच्या लेखी परीक्षा होणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.