नाशिक – सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यात सुमारे १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसाचा सर्वाधिक फटका कापूस, मका, कांद्याला बसला. जिल्ह्यातील ६५ गावांतील २० हजारहून अधिक शेतकरी पुन्हा बाधित झाले.
यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे ४० गावांतील ४०१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. कांदा, सोयाबीन, मका यासह फळपिकांना फटका बसला होता. सप्टेंबर महिन्यात पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा बसला. मध्यंतरी राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळत असताना नाशिकमध्ये तुलनेत प्रमाण कमी होते. परंतु, सोमवारी व मंगळवारी काही भागात त्याने जोरदार हजेरी लावली. मालेगाव, नांदगाव, सुरगाणा तालुक्यात पावसाने शेतीचे पुन्हा मोठे नुकसान केल्याचे समोर आले आहे.
कृषी विभागाच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात १३ हजार ८०१.६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महत्वाची बाब म्हणजे हे सर्व नुकसान मालेगाव, नांदगाव व सुरगाणा या तीन तालुक्यात झाले आहे. पावसात ५११९ हेक्टवरील कापूस, ४६३१ हेक्टरवरील मका, २१९५ हेक्टरवरील कांदा, १७५३ हेक्टरवरील बाजरी व इतर पिके, पाच हेक्टरवरील सोयाबीन आणि ९९ हेक्टरवरील डाळिंबाचे नुकसान झाले.
जिरायत क्षेत्रातील १३ हजार ७०३ तर बहुवार्षिक फळपिकांच्या सुमारे ९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या बाबतची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.
२० हजारहून अधिक शेतकरी बाधित
अतिवृष्टीत मालेगाव तालुक्यातील (३४), नांदगाव तालुक्यातील (२८), सुरगाणा तालुक्यातील (तीन) अशी जिल्ह्यातील एकूण ६५ गावे बाधित झाली. मालेगाव तालुक्यातील १९ हजार ३९५, नांदगाव तालुक्यातील ८१८ व सुरगाण्यातील नऊ असे एकूण २० हजार २२२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
ऑगस्टमधील नुकसानीमुळे पावणेचार कोटींची मदत प्राप्त
ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे ४०१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण करुन प्रशासनाने नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाला सादर केला आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या सात हजारहून अधिक आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाटी प्रशासनाने तीन कोटी ८१ लाख ६७ हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे.