नाशिक – शहरातील टाकळी उपकेंद्रात एकेरी वाहिनीचे दुहेरी वाहिनीत रूपांतर करण्याच्या कामासाठी द्वारका, उपनगर आणि नाशिकरोड अंतर्गत परिसरात वीज पुरवठा शनिवारी संपूर्ण दिवसभर बंद ठेवण्याचे महावितरणने जाहीर केले होते. तथापि, या दिवशी शहरातील इतर भागात तोच कित्ता गिरवला गेल्यामुळे अनेक भागात नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. दुसरीकडे देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे संपूर्ण शहरात पाणी पुरवठा देखील झाला नाही. यामुळे नाशिककरांना एकाच दिवशी दुहेरी संकटांना तोंड द्यावे लागले.
महावितरणच्या शहर विभाग दोन अंतर्गत योग्य दाब तसेच उच्चतम सेवेसाठी एकेरी वाहिनीचे दुहेरी वाहिनीत रूपांतर करण्याचे काम करण्याचे नियोजित होते. त्यासाठी शनिवारी सकाळपासून द्वारका, उपनगर आणि नाशिक रोडमधील अनेक भागात वीज पुरवठा बंद करण्यात आला. याची पूर्वसूचना महावितरणने दिली होती.
टाकळी विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या उत्तरा नगर, टाकळी, शंकर नगर, पुणेरोड, औद्योगिक, मुंबई रोड, सारडा सर्कल, गोदावरी आणि जुने नाशिक या सर्व वाहिनीवरून ज्या भागात वीज पुरवठा होतो, तिथे सकाळपासून वीज पुरवठा बंद करण्यात आला. या शिवाय, उपनगर विद्युत उपकेंद्रांतर्गत गांधीनगर, समतानगर, इच्छामणी, गांधीनगर, गॅरिसन, आर्टिलरी, नाशिकरोड व डिजीपीनगर वाहिन्यांवरील वीज पुरवठा बंद होता.
या कामामुळे शहरातील निम्या भागात वीज पुरवठा खंडित झाला असताना दुसरीकडे शहर विभाग एकमध्ये वेगळी स्थिती नव्हती. अनेक भागात दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. कॉलेज रोड, कालिका, हिरावाडी, पंचवटी, सिडको आदी भागात देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे वीज पुरवठा बंद ठेवला गेल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अनेक भागात चार ते पाच तास वीज गायब होती. काही भागात विजेचा लपंडाव सुरू होता. यामुळे घरगुती विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. पंचवटी आणि अमृतधाम भागात काही महिन्यांपासून सातत्याने वीज पुरवठ्यात अडचणी उद्भवत आहेत. परंतु, कायमस्वरुपी दुरुस्ती केली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. बाजारपेठेत वीज नसल्याने व्यापारी वर्गाला त्रास सहन करावा लागला.
पाणीही नाही
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत प्रवाह मीटर बसविणे,पाणी पुरवठा प्रणालीतील देखभाल दुरुस्ती, जल वाहिनीच्या दुरुस्ती कामांमुळे शनिवारी संपूर्ण शहरात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला. यामुळे नागरिकांना पाणीबाणीला तोंड द्यावे लागले. अर्थात विविध स्वरुपाच्या कामांसाठी पाणी पुरवठा २४ तास बंद ठेवणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण दिवसभर पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली होती. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी होतात. त्यात वेगवेगळ्या कारणांस्त्व पाणी पुरवठा बंद केला जात असल्याने नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागले.