नाशिक – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेच्यावतीने आयोजित पहिल्या संयुक्त बैठकीला ठाकरे गटातील अंतर्गत कलहाचे ग्रहण लागले. विधानसभा निवडणूक प्रचारात ठाकरे गटाने अमली पदार्थांच्या (एमडी ड्रग) मुद्यावरून भाजपला लक्ष्य केले होते. हा मुद्दा प्रचारात फारसा प्रभावी ठरला नसल्याकडे ज्येष्ठ पदाधिकारी जयंत दिंडे यांनी भाषणात लक्ष वेधल्याने माजी महापौर विनायक पांडे हे संतप्त झाले. त्यांनी विधानसभेत आपल्या उमेदवाराला किती मते मिळाली, याचे दाखले देत दिंडे यांना सुनावले. व्यासपीठावर दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने इतरांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, संतप्त पांडे हे बैठकीतून निघून गेले.
ठाकरे गट आणि मनसे यांच्या वतीने शुक्रवारी कायदा व सुव्यवस्थेसह विविध प्रश्नांवर संयुक्त मोर्चाच्या नियोजनासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ठाकरे गटाच्या शालीमार कार्यालयात घेण्यात आली. ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिेते यांच्यानंतर ज्येष्ठ पदाधिकारी जयंत दिंडे यांचे भाषण सुरू झाले. विधानसभा निवडणुकीत अमली पदार्थांचा मुद्दा प्रचारात प्रभावी ठरला की नाही, यावरून वाद झाल्याचे बोलले जाते.
दिंडे यांचे भाषण सुरू असताना माजी महापौर विनायक पांडे हे संतप्त झाले. त्यांनी व्यासपीठावरच दिंडेंना सुनावले. अन्य नेत्यांनी पांडेंना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते बैठकीतून निघून गेले. त्यांची समजूत काढण्यासाठी दिंडे हे देखील सभागृहातून बाहेर पडले. मात्र, संतप्त पांडे हे वाहनातून निघून गेले होते.
या संदर्भात विनायक पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, जयंत दिंडे यांची विधाने पटली नसल्याचे सांगितले. मुळात ठाकरे गटाच्या उमेदवारास नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात यापूर्वी २५ हजार आणि २३ हजार मते मिळाली होती. यावेळी वसंत गितेंना ८७ हजारहून अधिक मते मिळाली. योग्य मुद्यांवर प्रचार झाल्यामुळे मतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा दाखला पांडे यांनी दिला. जयंत दिंडे यांनी बैठकीत कुठलाही वाद झाला नसल्याचा दावा केला.
आपण मांडलेला मुद्दा पूर्ण होण्याआधीच पांडे यांचा गैरसमज झाला. आम्ही लहानपणापासून शिवसेनेत एकत्रित काम करतो. पांडे यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिलेले आहे. सत्ता नसतानाही त्यांनी संकटकाळात काम केले आहे. या घटनाक्रमाने आपल्यात अपराधीपणाची भावना निर्माण झाल्याचे दिंडे यांनी नमूद केले.
वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
या वादानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी गैरसमजातून छोटासा वाद झाल्याचे सांगितले. कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. अमली पदार्थांचा विषय पूर्वी होता, तसाच आजही आहे. गुजरातमधून अमली पदार्थ शहरात येतात. असे भाषणात सांगितले जात असताना उभयतांमध्ये गैरसमज झाल्याचे सूर्यवंशी यांनी नमूद केले.