नाशिक – कळवण तालुक्यातील चणकापूर येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या तिसरीतील विद्यार्थ्याचा त्वरीत उपचार न मिळाल्याने सोमवारी त्याचा मृत्यू झाला. संतप्त पालकांनी तब्बल पाच तास मृतदेह मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवत या प्रकरणात दोषी असलेल्यांविरुध्द कारवाईची मागणी केल्यानंतर अभोणा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक तसेच अधीक्षक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चणकापूर आश्रमशाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या रोहित बागूलची प्रकृती काही दिवसांपासून बिघडली होती. परंतु, वेळेत त्याच्याकडे आश्रमशाळा प्रशासनाकडून लक्ष देण्यात आले नसल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. प्रकृती खालावल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तब्येत अधिक बिघडल्याने कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी करुन डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा प्रकार घडला तेव्हां आश्रमशाळेचे अधीक्षक संजय नांदणे रजेवर तर मुख्याध्यापक बालाजी भुजबळ अनुपस्थित होते. संतप्त पालकांनी रोहितचा मृतदेह आश्रमशाळेत आणून थेट मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवला.
सुमारे पाच तास मृतदेह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसमोर पडून होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त दिनकर पावरा आणि प्रकल्प अधिकारी अकुनरी नरेश घटनास्थळी दाखल झाले. संतप्त पालकांशी चर्चा करुन त्यांनी त्यांची बाजू समजून घेतली. पालकांचा रोष पाहता नांदणे आणि भुजबळ यांना बडतर्फ करण्यात आले. पालकांनी संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन शाळेच्या आवारात ठिय्या दिला. या पार्श्वभूमिवर नांदणे आणि भुजबळ या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अभोणा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी दिली. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
रोहित यास काही दिवसांपासून अंगदुखीचा त्रास जाणवत होता. स्थानिक आरोग्य सेविकेच्या मदतीने त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत होते. त्याच काळात वडिलांनी त्याच्याशी संपर्क केला. त्यांनी शेजारील माणसांच्या मदतीने रोहित यास घरी नेले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वास्तविक, रोहित आजारी असतांना अधीक्षकांनी त्याला घरी सोडायला नको होते. त्याला सोडले. हा त्यांचा दोष आहे. मुख्याध्यापक हजर नसल्याने दोघांना तातडीने निलंबित करण्यात आले. – दिनकर पावरा (सहायक आयुक्त, आदिवासी विकास विभाग).