नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यवाहपदाची धुरा सांभाळताना सुरेश भटेवरा यांनी अनेक उपक्रम राबविले. नवीन संकल्पना मांडल्या. भावी उपक्रमांची आखणी केली होती. विश्वस्त नियुक्ती प्रक्रियेतील मतभेदातून भटेवरा हे राजीनामा देत प्रतिष्ठामधून बाहेर पडले. परंतु, भटेवरा हे कार्यवाहपदी नसले तरी त्यांनी सुरू केलेले वा नियोजित उपक्रमात मात्र खंड पडणार नाही, ते पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे प्रतिष्ठानने म्हटले आहे.
नवीन विश्वस्त नियुक्ती प्रक्रियेत अविश्वास दाखविला गेल्याने भटेवरा यांनी कार्यवाहपदाचा दिलेला राजीनामा अलीकडेच विश्वस्त मंडळाने स्वीकारला. या घटनाक्रमात अध्यक्ष वसंत डहाके यांनी कुसुमाग्रजांच्या काळापासून सल्लागार मंडळ असल्याचे नमूद केल्यामुळे विद्यमान सल्लागारांना अधिक बळ मिळाले. कार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळताना भटेवरा यांनी वर्षभरात नवनवीन संकल्पना मांडून त्यांना आकार देण्यास सुरुवात केली होती. करोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे मुले पुढील वर्गात गेली, पण अनेकांना मराठी भाषेत अजूनही नीट लिहिता, वाचता आणि बोलता येत नाही. हे लक्षात घेऊन शहरातील शाळांमध्ये वर्षभर कुसुमाग्रज वाचन अभियान राबविण्याचा संकल्प केला होता. या शैक्षणिक वर्षात पाच हजार विद्यार्थ्यांसाठी हा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे नियोजन होते.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची नाशिक ही कर्मभूमी. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील उदयोन्मुख कलावंताना नाट्य, चित्रपटसृष्टीत कला सादर करण्यासाठी संधी मिळावी म्हणून कुसुमाग्रज स्मारक प्रमुख माध्यम बनावे, अशी भटेवरा यांची संकल्पना होती. महाविद्यालयीन होतकरू तरुणांसाठी विशेष वर्ग आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे यांसह इतरांनी येण्याचेही मान्य केले होते. चित्रीकरणासाठी येणाऱ्या विविध कलावंतांनी कुसुमाग्रज स्मारकाच्या वास्तूला भेट द्यावी आणि तरूण पिढीशी संवाद साधावा, यासाठी मनमोकळ्या गप्पांचे कार्यक्रम सुरू करण्याचे नियोजन होते. भटेवरा यांच्या राजीनाम्यामुळे प्रतिष्ठानच्या अशा विविध उपक्रमांचे भवितव्य अधांतरी बनल्याची भावना सभासदांकडून व्यक्त होत असताना अध्यक्षांनी मात्र सकारात्मक भूमिका घेतली आहे.
माजी कार्यवाह सुरेश भटेवरा यांनी सुचविलेले उपक्रम प्रतिष्ठानकडून सुरू राहतील. कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने विशेष कार्यक्रम घेण्याचे निश्चित झालेले आहे. नाट्य क्षेत्रातील शिक्षणासाठी प्रमुख व्यक्तींच्या कार्यशाळा घेण्याचे ठरलेले आहे. हे सर्व प्रतिष्ठानचे उपक्रम असल्याने त्यात खंड पडणार नाहीत. भटेवरा यांनी ज्या उपक्रमांची मांडणी केली, ते पुढे नक्की सुरू राहतील. अनेक उपक्रमांची जुळवाजुळव सुरू आहे. – वसंत आबाजी डहाके (अध्यक्ष, कुसुमाग्रज प्रतिष्ठान)
