नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यवाहपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वर्षभरात कामाची चुणूक दाखविणाऱ्या सुरेश भटेवरा यांना चार वर्षे बाकी असताना अकस्मात राजीनामा देण्याची वेळ का आली, याची चर्चा साहित्य, सांस्कृतिक वर्तुळात होत आहे. लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या संस्थेचा कारभार हळूहळू एकचालकानुवर्तीच्या दिशेने होऊ लागल्याची अनुभूती काहींना येत आहे.

अलीकडेच तीन नवीन विश्वस्त निवड प्रक्रियेत या संदर्भातील प्रस्ताव ऐनवेळी धुडकावत साहित्य व नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ, उदयोन्मुख मंडळींना अवमानित करण्याचा प्रमाद घडल्याचे सांगितले जाते. संस्थेचा संपूर्ण कारभार विश्वस्त मंडळ कमी आणि ‘सल्लागार’ अधिक सांभाळू लागल्याची चर्चा साहित्य वर्तुळात होत आहे.

ज्ञानपीठप्राप्त कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर यांना अभिप्रेत सांस्कृतिक व सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील मान्यवरांनी एकत्रित येऊन कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना केली. बराच काळ सर्वांच्या सोबतीने, मत-मतांतरे, विचार जाणून काम केले जात असे. मागील काही वर्षात मात्र यात बदल झाल्याची जाणीव काही सभासदांना प्रकर्षाने होत आहे. प्रदीर्घ काळ संस्थेवर प्रभाव राखणाऱ्या काही निवडक व्यक्तींच्या हाती संपूर्ण कारभार एकवटला. ते म्हणतील, ती पूर्व दिशा या प्रकारे कारभार होऊ लागल्याने मूळ उद्देशाला तडा जात असल्याची भावना साहित्य वर्तुळात उमटत आहे. संस्थेच्या बैठकीत सुरेश भटेवरा यांनी सर्वांसमोर कार्यवाहपदाचा तसेच विश्वस्तपदाचा राजीनामा अध्यक्षांकडे सादर केला. अध्यक्षांनी तो नामंजूर केल्यानंतरही भटेवरा हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचे बोलले जाते.

कार्यवाह भटेवरा यांच्याकडून तीन नवीन विश्वस्तांची प्रक्रिया पुढे नेली जात होती. यात अध्यक्षांपासून विश्वस्त मंडळातील सर्व सदस्यांकडून पसंतीक्रमही घेतला गेला, त्यावर कार्यालयात चर्चा झाली. बहुमताने पुढे आलेल्या नावांमध्ये लेखिका व मुलाखतकार प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तमराव कांबळे, प्रसिद्ध नाट्यलेखक दत्ता पाटील यांचा समावेश होता. या नावांवर सर्वांच्या म्हणजे अगदी सल्लागारांच्याही उपस्थितीत शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जाते.

संस्थेकडून संबंधितांशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रे मागवली गेली. पुढील बैठकीची निमंत्रणे दिली गेली. परंतु, ती बैठक गणसंख्येअभावी तहकूब झाली. नंतर पुढील विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सर्व चित्र पालटले. एक सल्लागार व दोन विश्वस्तांनी कुठलेही तर्कशुद्ध कारण न देता त्या नावांना विरोध करीत त्यांच्या निवडीचा प्रस्ताव धुडकावला. ही संपूर्ण प्रक्रिया नाकारत पुन्हा तीन नव्या नावांचा पूनर्विचार करण्याचा निर्णय बैठकीत रेटून नेल्याचे बोलले जाते. या घटनाक्रमातून प्रतिष्ठानकडून साहित्य व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांचा अवमान झाला, शिवाय, निवड प्रक्रियेवर अविश्वास दाखविला गेल्याच्या अस्वस्थेतून भटेवरा हे राजीनामा देऊन बाहेर पडल्याचे सांगितले जाते.

कार्यवाह सुरेश भटेवरा यांच्या राजीनाम्याच्या विषयावर आपण सध्या बोलू शकत नाही. सगळ्यांंच्या विचार विनिमयाने त्यावर निर्णय होईल. प्रतिष्ठानचा कारभार कोण चालवते, यावर विविध प्रकारे चर्चा होत असेल, परंतु, तसे काहीही नाही. – वसंत आबाजी डहाके (अध्यक्ष कुसुमाग्रज प्रतिष्ठान)