नाशिक – शहर परिसरासह नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा संचार आणि बिबट्याचे गुराढोरांवर हल्ले हे आता नेहमीचे झाले आहे. काही ठिकाणी तर बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलांचेही बळी गेले आहेत. त्यामुळे बिबट्याच्या धाकात शेत शिवारातील नागरिक असताना भक्ष्याच्या शोधात एका गावातील शेतात आलेल्या बिबट्याला दोन कुत्र्यांनी परतावून लावण्याची घटना घडली. कुत्र्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या या बिबट्यालाच कुत्र्यांनी केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे बिबट्याला ऊसाच्या शेतात पळून जावे लागले. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील हा प्रकार एका चित्रफितीमुळे उघडकीस आला.
नाशिक जिल्ह्यातील मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला आहे. शेतांमध्ये तर बिबट्या कधीही दिसू लागला आहे. बिबटे शिकारीच्या शोधात अनेकदा मानवी वस्तीत येतात. गुरे, कुत्रे, कोंबड्या यांची शिकार करतात. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी लहान मुलांवर देखील बिबट्यांनी हल्ले केले आहेत. रक्षा बंधनाच्या आदल्या दिवशी नाशिक तालुक्यात तीन वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. बालकाच्या मृत्युमुळे स्थानिक आक्रमक झाले. त्यांनी थेट वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून बिबट्याला त्वरीत जेरबंद करण्याची मागणी केली होती. बिबट्या पकडला न गेल्यास वन मंत्र्याच्या निवासस्थानी धडकण्याचा इशारा दिला होता.
या मोर्चानंतर खडबडून जाग आलेल्या वन विभागाने सापळा लावून बिबट्याला जेरबंद केले होते. या घटनेची चर्चा सुरु असतानाच कुत्र्याने बिबट्याला पळवून लावल्याचा प्रकार घडला. गुरूवारी रात्री बिबट्या शिकार करण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील चास येथील कैलास गांगुर्डे यांच्या घराजवळील मोकळ्या परिसरात आला. बिबट्याने शिकार मिळवण्यासाठी परिसरातील दोन कुत्र्यांवर लक्ष केंद्रीत केले. एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवला. त्यावेळी दुसऱ्या कुत्र्याने बिबट्याला प्रतिकार सुरु केला. नंतर दोन्ही कुत्र्यांनी बिबट्यावर हल्ला केला. एका कुत्र्याने बिबट्याला आपल्या तोंडात पकडून काही अंतरापर्यंत फरफटत नेले. अचानक झालेल्या हल्ल्याने भांबावलेल्या बिबट्याने जवळच्या शेतात धूम ठोकली. याविषयी येवला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांनी माहिती दिली.
दिंडोरी तालुक्यातील चास गावानजीक कैलास गांगुर्डे यांच्या शेतात हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. कुत्र्यावर बिबट्या हल्ला करण्यासाठी गेला. त्याच्यावर झडप घालायचा प्रयत्न केला असता दोन्ही कुत्र्यांनी बिबट्यावर प्रतीहल्ला केला. हा हल्ला एवढा जोरदार होता की बिबट्याचा निभाव लागला नाही. कुत्र्याने बिबट्याला काही अंतरापर्यंत ओढत नेले. कुत्र्याची पकड सैल होताच बिबट्या संधी साधून जवळच्या शेतात पळून गेल्याचे घुगे यांनी सांगितले.