नाशिक – मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करणाऱ्यांसाठी महापालिकेने दिलेल्या आठ टक्के सवलतीचा लाभ आतापर्यंत अंदाजे एक लाख १० हजारच्या आसपास मालमत्ताधारकांनी घेतला आहे. या माध्यमातून ४५ कोटींची कर वसुली झाली. परंतु, गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत हे प्रमाण १० कोटींनी कमी आहे. वसुलीत घट होण्यामागे जनजागृतीचा अभाव आणि देयकांचे न झालेले वितरण हे कारण असल्याचे सांगितले जाते.
चालू वर्षात कर वसुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी एप्रिल महिन्यात आठ टक्के, मेमध्ये सहा आणि जून महिन्यात तीन टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच ही रक्कम या काळात ऑनलाईन भरून अतिरिक्त दोन टक्के सवलतीचा लाभ घेता येईल. शहरात पावणेसहा लाख मालमत्ताधारक आहेत. एप्रिल अखेरपर्यंत कर भरून आठ टक्के सवलत मिळणार होती. एप्रिलच्या अखेरच्या दिवसापर्यंत ४५ कोटींची मालमत्ता कर वसुली झाली. सुमारे एक लाख १० हजार मालमत्ताधारकांनी याचा लाभ घेतल्याचे सांगितले जाते. परंतु, हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात ५५ कोटींची वसुली झाली होती. मालमत्ता देयकांचे वितरणाचे काम त्रयस्थ यंत्रणेला दिले गेेले आहे. त्यांच्यामार्फत अद्याप घरोघरी देयकांचे वाटप झालेले नाही.
महापालिकेने दिलेल्या सवलतीचा प्रचार व प्रसार झाला नाही. मागील वर्षी महापालिकेने भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून मालमत्ताधारकांना याची माहिती दिली होती. यावेळी तसे काही घडले नाही. या पार्श्वभूमीवर, एप्रिलच्या सवलतीचा लाभ मे महिन्यात सुरू ठेवण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर होत आहे. या महिन्यात आठ टक्क्यांची सवलत कायम ठेवून मालमत्ताधारकांना प्रोत्साहित केले जाणार असल्याचे सांगितले जाते.