नाशिक : सलग नऊ दिवसांपासून गारपीट, वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाने पिकांच्या नुकसानीत दिवसागणिक भर पडत आहे. ५ ते ११ मे या कालावधीत जिल्ह्यातील ४२४० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात सर्वाधिक फटका आंबा आणि कांद्याला बसला. ४०० हेक्टरवरील भाजीपाला पावसाने भुईसपाट केला. आठवडाभरातील पावसात ६५८ गावांतील १५ हजार २४४ शेतकरी बाधित झाले. नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम प्रगतीपथावर असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मे महिन्याच्या प्रारंभी पारा उंचावत असताना हवामानात अकस्मात बदल झाले. पाच मेपासून आजतागायत दररोज मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. गारपीट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सातत्याने कोसळत आहे. यामुळे जणू पावसाचा हंगाम महिनाभर आधीच सुरू झाला की काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे. उन्हाळ कांद्याची काढणी सुरू असताना हे नैसर्गिक संकट कोसळले. शेतात तयार झालेला आणि खळ्यात काढून ठेवलेला कांदा पावसात भिजला. कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले. परिपक्व होण्याच्या मार्गावर असलेल्या आंब्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. सात दिवसात २०३५ हेक्टरवरील आंब्यांचे नुकसान झाले. १२७१ हेक्टरवरील कांदा, १७१ हेक्टरवरील कांदा रोपे. भाजीपाला ३९५ हेक्टर, टोमॅटो ९४, डाळिंब ६९ हेक्टर असे या सात दिवसात ४२४० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात नमूद आहे.

सुरगाणा, पेठला फटका

पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील ६५८ गावांतील १५ हजार २४४ शेतकरी बाधित झाले. सर्वाधिक फटका सुरगाणा आणि पेठ तालुक्यास बसला. सुरगाणा तालुक्यातील १९५ गावे (४५११), पेठमधील १४५ गावे (४८१९ शेतकरी) बाधित झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्र्यंबकेश्वर ५६ गावे (५८९), बागलाण २४ (१११६), चांदवड १२ (१५८४), निफाड ३१ (३९२), मालेगाव ११ (४७३), कळवण ५६ (९६२), सिन्नर २२ (१२४), येवला एक (एक), नांदगाव सहा गावे (५३ शेतकरी), इगतपुरी २४ गावे(२२३), दिंडोरी १४ गावे (९४) शेतकरी बाधित झाले आहेत.

पीकनिहाय नुकसान (हेक्टर)

आंबा – २०३५

कांदा – १२७१

कांदा रोपे – १७१

टोमॅटो – ९४

भाजीपाला – ३९५

डाळिंब – ६९