नाशिक : कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी महाएल्गार मोर्चात नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून नागपूरची नाकेबंदी करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा माजीमंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनात नाशिकमधील कांदा उत्पादक आणि जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. नाशिक जिल्हा बँकेचे थकबाकीदार नागपूरकडे मार्गस्थ झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी महामार्गावर ठिय्या देत आंदोलन सुरू केले आहे. नागपूरमधील अनेक महामार्गांवर चक्काजाम आंदोलन सुरू असल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. या आंदोलनात देशात सर्वाधिक कांदा व द्राक्ष पिकवणाऱ्या नाशिकमधील शेतकरी सहभागी झाले आहेत.

नागपूर येथे प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या शेतकरी, मजूर व सामान्य जनतेच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या लढ्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले. कडू यांनी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आरक्षण प्रश्न व शासकीय कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नि:स्वार्थपपणे संघर्ष केला आहे. त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही उभे आहोत. महाएल्गार मोर्चात नाशिकमधील कांदा उत्पादक देखील सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी प्रदीर्घ काळापासून कर्जमाफीसाठी संघर्ष करीत आहेत. नागपूर येथील बच्चू कडू यांच्या आंदोलनास नाशिक येथे सुरू असलेल्या आंदोलकांनी जाहीर पाठिंबा देत भगवान बोराडे, दिलीप पाटील हे नागपूरकडे रवाना झाले. जिल्ह्यातून जिल्हा बँकेचे शेकडो थकबाकीदार शेतकरी नागपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, ९३८ आदिवासी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, दिलीप पाटील यांनी दिली.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ८८१ दिवसांपासून आम्ही जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करीत आहोत. शासनाकडे अनेक वेळा अर्ज, विनंती करूनही त्याची दखल घेतली गेली नाही, याकडे उभयतांनी लक्ष वेधले. नाशिकमधील कांदा उत्पादक आणि थकबाकीदार शेतकरी बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. परंतु, कुणीही ट्रॅक्टरने गेलेले नाहीत. कारण, नाशिक ते नागपूर हे अंतर रस्ते मार्गाने सुमारे ६५० किलोमीटर आहे. इतक्या अंतरावर ट्रॅक्टर नेणे अवघड असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी रेल्वेचा मार्ग अवलंबला असल्याचे भारत दिघोळे व भगवान बोराडे यांनी सांगितले.