नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिकभोवती सुमारे सहा हजार कोटींचे बाह्य वळण रस्ते अर्थात रिंग रोड उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी केंद्र सरकार ५० टक्के निधी देणार आहे. रिंग रोडचा प्रकल्प नाशिकचा कायापालट करणारा ठरेल, असा विश्वास कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
मुंबई, गुजरात, पालघर, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर आणि धुळे येथून मोठ्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार, राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांसह या प्रमुख मार्गांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या कुंभमेळा आढावा बैठकीत रिंग रोड, नवीन घाटांची बांधणी, द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न, सीसी टीव्ही कॅमेरे आदी विषयांवर चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २२०० कोटींच्या कामांची निविदा पूर्ण झाली आहे. यातील काही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यासाठी एकत्रित स्वरुपात (क्लब टेंडरींग) केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या सर्व कामांना लवकरच सुरूवात होणार आहे.
नाशिकच्या सभोवताली उभारण्यात येणाऱ्या सहा हजार कोटींच्या रिंग रोडच्या कामांसाठी ५० टक्के निधी केंद्राकडून दिला जाणार आहे. नाशिकसह त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी केंद्र सरकार निधी उपलब्ध करणार आहे. कुंभमेळ्यापूर्वी द्वारका चौकातील वाहतुकीचा प्रश्न सोडवला जाईल, असे महाजन यांनी नमूद केले.
नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी रिंग रोड, रस्त्यांचे विस्तारीकरण आदींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. बहुप्रतिक्षित नाशिक भोवतीच्या बाह्य वळण रस्त्याला दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती.
सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात. या काळात वाहतुकीवर काही निर्बंध येतात. पर्यायी मार्गाने ती वळवली जाते. ग्रामीण भागातून प्रमुख राष्ट्रीय व राज्य मार्गांना जोडणाऱ्या वळण रस्त्याने महामार्ग व शहरी भागातील दळणवळणाचा ताण बराचसा कमी होऊन वाहतूक सुरळीत राखण्याचा विचार करण्यात आला आहे. घोटी-पहिने-त्र्यंबकेश्वर-जव्हार फाटा, द्वारका सर्कल – सिन्नर (समृद्धी महामार्ग) – नांदूर शिंगोटे – कोल्हार, नाशिक ते कसारा, सावली विहीर ((समृद्धी महामार्ग) – शिर्डी – शनिशिंगणापूर फाटा, नाशिक ते धुळे, त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर, सावली विहीर – मनमाड – मालेगाव, घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी, शनिशिंगणापूर फाटा – अहिल्यानगर (खरवंडी फाटा) या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे.