नाशिक – नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) राज्यराणी एक्स्प्रेसमधून दोन साधारण बोगी (खुर्चीयान) काढून टाकण्याचे दक्षिण मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. त्याऐवजी दोन शयनयानच्या (स्लीपर कोच) बोगी जोडण्यात येणार आहेत. मनमाड, नाशिकपासून आधीच ही रेल्वे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन धावते. नवीन निर्णयामुळे राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये केवळ चार साधारण बोगी राहतील. स्थानिक प्रवासी कुठे बसणार, असा प्रश्न करीत नाशिककरांसाठी राज्यराणी एक्स्प्रेस उपयोगिताशून्य केली जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघटनांमधून उमटत आहे.
पाच ऑगस्टपासून १७६११/१२ नांदेड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये दोन्ही बाजुंच्या प्रवासात हे बदल करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातून मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागणार आहे. मुळात, सुरुवातीला मनमाड-कुर्ला मार्गावर धावणारी राज्यराणी एकस्प्रेस नंतर मनमाड-सीएमएसटी अर्थात मुंबई अशी समायोजित झाली. पुढे स्थानिकांचा विरोध झुगारून ती थेट नांदेडपर्यंत विस्तारण्यात आली. त्यावेळी स्थानिक प्रवाशांसाठी मनमाड आणि नाशिकसाठी काही बोगी राखीव ठेवल्या गेल्या. या ठिकाणी या बोगी उघडल्या जात होत्या. परंतु, करोनापश्चात मनमाड, नाशिकहून बोगी उघडण्याची सुविधा पूर्ववत होऊ शकली नाही. राखीव बोगी ठेवण्याच्या अटीवर ही गाडी नांदेडला नेण्यात आली. नंतर त्याचे पालन करण्यात आले नसल्याची तक्रार रेल्वे वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश फोकणे यांनी केली.
मनमाड आणि नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही अतिशय सोयीची गाडी मानली जाते. नांदेडहून रात्री १० वाजता सुटणारी ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता नाशिकरोड स्थानकात येते. आणि मुंबईत (सीएसएमटी) सकाळी १०.०७ मिनिटांनी पोहोचते. दोन सर्वसाधारण बोगी काढून टाकल्यास मासिक पासधारकांना साधारण चार डब्यात जागा मिळणार नसल्याचे मासिक पासधारक संघटनेचे म्हणणे आहे.
‘राज्यराणी’ सोयीची का ?
मनमाड, नाशिकहून रेल्वेने प्रवास करणारे बहुतेक शासकीय, निमशासकीय कार्यालये व न्यायालयात जाणारे असतात. संबंधितांना सकाळी साडेदहापूर्वी कार्यालयात पोहोचणे आवश्यक असते. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जागा नसते. राज्यराणी एक्स्प्रेसनंतर सव्वा सात वाजता मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आहे. ही गाडी पावणेअकरा वाजता मुंबईत पोहोचते. कार्यालयात वेळेत हजेरी नोंदविणाऱ्यांसाठी ती गैरसोयीची ठरते, याकडे लक्ष वेधले जाते. आता राज्यराणी एक्स्प्रेसमधील साधारण दोन बोगी शयनयानमध्ये परावर्तीत झाल्यास नाशिकच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. कारण कार्यालयात जाताना दिवसा झोपून कोण प्रवास करणार, असा प्रश्न उपस्थित केला जातो.
१८० आसने कमी होणार
रेल्वेने साधारण दोन बोगी काढून टाकल्यानंतर साधारण बोगींमध्ये ५४० पैकी १८० आसने कमी होतील. केवळ ३६० आसने राहतील. साधारणच्या सहा बोगी असताना मनमाड, नाशिकहून मुंबईला जाताना १३० ते १३५ टक्के प्रवासी असतात. आता दोन बोगी कमी झाल्यास मुंबईला ये-जा करणाऱ्या स्थानिक चाकरमान्यांंना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.