नाशिक – सातपूर गोळीबार प्रकरणात अजून एका गुन्हेगाराला अटक करण्यात आल्याने आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या ११ वर पोहचली आहे. गोळीबाराचा मुख्य सूत्रधार भूषण लोंढे फरार आहे. वेगवेगळी पथके त्याच्या मागावर आहेत.

सातपूर येथील एका हॉटेलमध्ये लोंढे टोळीतील प्रमुख भूषण लोंढे याने गोळीबार करत दहशत माजविण्याचा प्रकार केला. यात एक जण जखमी झाला. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे होऊ लागल्याने पोलिसांनी भूषणचे वडील प्रकाश लोंढे, त्याचा भाऊ दीपक याला या गुन्ह्यात सहआरोपी केले. त्यांच्याकडून नाशिक जिल्हा- कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेतले. राजकीय पटलावर याचे पडसाद उमटत असतांना लोंढे टोळीचा गुन्हेगारी विश्वातील सहभाग या माध्यमातून स्पष्ट झाला.

पोलिसांनी आतापर्यंत प्रकाश लोंढे, दीपक लोंढे यासह या प्रकरणात १० गुन्हेगारांना अटक करुन त्यांना पोलीस कोठडीचा पाहुणचार दिला. या गुन्ह्यातील एक संशयित संदीप गांगुर्डे हा घटना घडल्यापासून फरार होता. पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. संदीप यास नाशिकजवळून ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस काेठडी सुनावण्यात आली. संदीप सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सातपूर, त्र्यंबकेश्वर, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, गोळीबार प्रकरणात पोलिसांनी प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक आणि अन्य साथीदारांना ताब्यात घेतले होते. मुख्य सूत्रधार भूषण लोंढे अद्याप फरार आहे. गोळीबार प्रकरणात न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर अंबड पाेलिसांनी एका गुन्ह्यात लोंढे पिता-पुत्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणात ते सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी घडल्या. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या अनधिकृत मालमत्तेवर बुलडोझर कारवाईचा मार्ग अनुसरला. माजी नगरसेवक प्रकाश लोंढे टोळीशी संबंधित अनधिकृत इमारत मागील आठवड्यात जमीनदोस्त करण्यात आली. पीएल ग्रुपचा दबदबा दर्शविणारे इमारतीसह आसपासचे फलक, कठडे हटविण्यात आले.

आता या टोळीविरुद्ध खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. सातपूर भागात जमिनीवर काही्नी अतिक्रमण करीत कब्जा केला. या जमिनीची कुणालाही विक्री करू देणार नाही, अशी ग्राहकांमध्ये दहशत पसरवून लोंढे टोळीने जमीन मालकाकडे जमीन स्वरुपात खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात प्रकाश लोंढे, दीपक लोंढे आणि भूषण लोंढेसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.