नाशिक – शहर परिसरातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. कुप्रसिध्द गुंडांच्या तोंडून आता नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेतले जात आहे. विशेष म्हणजे, नाशिकची गुंडगिरी ही फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिली नसून महिलाही त्यात आघाडीवर असल्याचे उघड झाले आहे. समाज माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवतींना देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काही दिवसांपासून शहर परिसरात समाज माध्यमातून गुन्हेगारांकडून नागरिकांमध्ये दहशत पसरविली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी आता समाज माध्यमांवर गस्त सुरू केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी फलकबाजी तसेच रिल्सच्या माध्यमातून कधी कोयता नाचवत, कधी तलवारी फिरवित समाज माध्यमात दहशत माजविण्यात येत आहे.
सहा ऑक्टोबर रोजी विसे मळा गोळीबारातील संशयित अजय बोरीसाची गुन्हे शाखा युनिट एकमध्ये हजेरी सुरू असतांना रिल्स तयार करुन दहशत पसरविणाऱ्या सनी कदमला देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेत त्याच माज उतरविला. देवळाली कॅम्प हद्दीत सनी कदमसह आठ जणांवर दहशत पसरविल्याचा गुन्हा आहे. पोलिसांनी सर्वांची आधी धिंड काढली होती. त्यानंतर आता पुन्हा गुन्हे शाखेने त्याला बोलावून घेत खास पोलिसी फराळ दिला. त्याने याआधी तयार केलेले दहशतीचे रिल दाखवत तसेच हसून दाखव, असे बजावले. पोलिसी फराळामुळे रडत रडतच हसण्याचा प्रयत्न त्याने केला. त्याच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेण्यात आले.
दरम्यान, समाज माध्यमात गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या दोन युवतींना देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या युवतींनी, हे नाशिक आहे ए भावा, इथे जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटणार, नाहीतर तुझी डेडबॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटणार, अशी दहशत पसरविणारी रिल तयार केली होती. त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात आली. यानंतर त्यांनी नाशिककरांची चित्रफितीतून माफी मागितली आहे. आम्ही चूक केली. त्यामुळे आमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तुम्ही मात्र ही चूक करू नका, अशी विनंती त्यांनी केली. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे त्यांच्याकडूनही वदवून घेण्यात आले.
गुन्हेगारांचा बालेकिल्ला ते कायद्याचा बालेकिल्ला समाज माध्यमात काही टवाळखोरांनी एक रिल टाकत नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला असा उल्लेख करुन पोलीस यंत्रणेला थेट आव्हान दिले होते. यादरम्यान शहरात होणारी लूट, हाणामारी, हत्या यामुळे पोलिसांवर चौफेर टीका होत होती. अखेर पोलिसांची सहनशक्ती संपली. आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दंडुक्याचा वापर सुरु केला. आता पोलीस गुन्हेगारांच्या तोंडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेत आहेत. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही ओळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, अजय बागूल, मामा राजवाडे, अजय बोरिसा यांच्यासह अनेकांची चांगलीच पाठ झाली आहे. त्यात आता महिला गुन्हेगारांचीही भर पडली आहे.