नाशिक : शहरातील राजकीय गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलणाऱ्या नाशिक शहर पोलिसांनी आता गुन्हेगारी टोळ्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याची तयारी केली आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर बुलडोझर कारवाईची जय्यत तयारी यंत्रणांनी केली आहे. गोळीबार प्रकरणात अटकेत असणारा रिपाइंचा पदाधिकारी, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे टोळीचा कारभार ज्या इमारतीतून चालतो, ती आयटीआय सिग्नल-खुटवडनगर मार्गावरील अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवारी या इमारतीवरील फलक आणि पीएल ग्रुपचा दबदबा दर्शविणारे सर्व फलक, कठडे हटविले गेले.
कांबळे वाडीतील मुख्य रस्त्यालगत ही इमारत आहे. या ठिकाणी प्रकाश लोंढे अर्थात पीएल ग्रुपचा फलक लावलेला होता. बुधवारी मनपाच्या पथकाने या फलकासह आसपासच्या भागातील पीएल ग्रुपचे अनधिकृत फलक हटवले. नंदिनी नदीवरील पुलालगत या अनधिकृत इमारतीतून पीएल ग्रुपचा कारभार चालत असल्याचा यंत्रणेला संशय आहे. या मुख्य मार्गाला लोंढे मार्ग आणि नदीवरील पुलास लोंढे पूल असे फलक लावले होते. तेही काढले गेले. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पुढील कारवाईचे नियोजन केल्याचे सांगण्यात येते.
नंदिनी नदीच्या निळ्या पूररेषेत ही अनधिकृत इमारत बांधल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेने बांधकामासंदर्भात कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. विहित मुदतीत लोंढे वा त्यांच्यावतीने कुणीही कागदपत्रे सादर करण्यास पुढे आले नाही. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत इमारतीवर कारवाईची तयारी केली. गुरुवारी या इमारतीवर हातोडा पडणार असल्याचे मनपा व पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या पाडकामाचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.
दरम्यान, सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित भूषण लोंढे फरार आहे. पोलिसांनी त्याचे वडील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदाधिकारी प्रकाश लोंढे, भूषणचा भाऊ दीपक लोंढे यांना सहआरोपी करत ताब्यात घेतले आहे. सोमवारी संशयितांच्या पोलीस कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. यामध्ये प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, संतोष पवार, अमोल पगारे, देवेश शिरताटे, शुभम गोसावी यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात फरार असलेल्या सनी विठ्ठलकर याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. बुधवारी लोंढे टोळीला मदत केल्याप्रकरणी दोन, तीन जणांची चौकशी करण्यात आली. शहरातील गुन्हेगारी फोफावण्यास कारक ठरलेल्या टोळ्यांचा कायमस्वरुपी बिमोड करण्यासाठी बुलडोझर कारवाईचा मार्ग अनुसरला जाणार आहे.