नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना पूर्णपणे मोकळीक दिल्याने नाशिक पोलिसांनी राजकीय गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडले आहे. आतापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, त्याचा मुलगा दीपक लोंढे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील बागूल यांचे पुतणे गौरव आणि अजय बागूल, भाजपचा कार्यकर्ता मामा राजवाडे हे पोलीस कोठडीत आहेत. त्यानंतर शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) माजी नगरसेवक पवन पवारही अडचणीत आला आहे. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी झाली आहे.

सध्या नाशिकमध्ये पोलीस गुन्हेगारांविरुध्द आक्रमक झाले आहेत. पोलिसांच्या धाकाने अनेक राजकीय गुन्हेगार नाशिक सोडून पसार झाले आहेत. सातपूर येथील एका हाॅटेलमधील गोळीबाराचे निमित्त झाले. आणि एकापाठोपाठ एक गुन्हेगारांना पोलिसा हिसका बसण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे त्यात सत्ताधारी भाजपशी संबंधित मंडळींचा अधिक सहभाग आहे. पोलिसांनी गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, त्याचा मुलगा दीपक लोंढे, शुक्रवारी भाजपमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेला मामा राजवाडे, शनिवारी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल यांना पोलिसांनी अटक केली. बड्या धेंडापर्यत पोलीस पोहचल्याने नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे.

गुन्हेगारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती गळ्यापर्यंत आल्यावर अखेर नाशिक पोलिसांनी राजकीय गुन्हेगारांविरुध्द कारवाईला सुरुवात केली. आतापर्यंत भाजपशी संबंधित आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी संबंधित राजकीय गुन्हेगारांवर कारवाई झाल्याने पुढील नंबर कोणत्या पक्षाचा अशी उत्सुकता सर्वांना होती. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरविल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा माजी नगरसेवक पवन पवार गुन्हा दाखल केला. पवन पवार आणि त्याच्या साथीदारांनी “कोणी लागत नाही नादी, मोठे लोक आमच्याकडे येतात, ओजीवाले गँगस्टर…” अशा आशयाचे दहशत पसरविणारे रॅप साँग असलेलं रील तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले.

यामुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याने पवन पवारवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन पवारचे सहकारी वतन वाघमारे, सोहेल पठाण, आशिष वाघमारे आणि नीलेश भोसले यांनी धमकीचा मजकूर असलेले रील तयार केले. याआधी स्वतःचे शुभेच्छा फलक अवैधरित्या लावल्याप्रकरणी पवन पवार व त्याच्या साथीदारांवर नाशिकरोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. पवन पवार फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. आता पवन पवारवर आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पवन पवारपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अडचण झाली आहे.