नाशिक : पोलीस पाटील पद प्रतिष्ठेचे आहे. समाज माध्यमामुळे माहिती वेगात लोकांपर्यंत पोहोचत आहे. यामुळे जसे फायदे, तसे तोटेही होत आहेत. या पार्श्वभूमीवर अधिक जागरुकता बाळगणे आवश्यक आहे. पोलीस पाटील हे अर्धे पोलीस आणि अर्धे पाटील आहेत. ते पोलीस आणि गावकऱ्यांमधील दुवा आहेत. वडिलकीच्या नात्याने गावात शांतता ठेवणे आवश्यक आहे. या पदाला न्याय द्यावा, पूर्वीप्रमाणे आताही वचक निर्माण करावा, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले.

येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित पोलीस पाटील कार्यशाळेत कराळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र मगर आदी उपस्थित होते. कार्यशाळेत नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी तसेच पेठ, निफाड आणि कळवण या चार विभागातील ७०० पोलीस पाटील उपस्थित होते.

पोलीस पाटील मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कराळे यांनी पोलीस पाटील पद सामाजिक कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कसे महत्वाचे आहे, गावात शांतता कशी राहु शकेल, याबाबत माहिती दिली. सर्व पोलीस पाटील गावपातळीवरील महत्वाचे घटक आहेत. पोलीस पाटील सर्वसामान्य नागरिकांसाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी थांबविण्यासाठी काम करतात, असे त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेत नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी तसेच पेठ, निफाड आणि कळवण या चार विभागातील ७०० पोलीस पाटील उपस्थित होते.

पोलीस पाटील हे प्रशासकिय कामात महत्वाचा आधारस्तंभ ठरतात. गावपातळीवरील माहिती संकलन, आपत्ती व्यवस्थापन व कायद्याच्या अंमलबजावणसाठी त्यांचे योगदान अमुल्य आहे. पोलीस पाटील यांची कर्तव्ये, अधिकार व मर्यादा याकडे लक्ष वेधतांना पोलीस पाटील यांनी रजिस्टर मध्ये ठेवायच्या नोंदी, गुन्हेगारी नियंत्रण, अवैध व्यवसाय समुळ उच्चाटन, तंटामुक्त गाव , सण उत्सव काळात राखावयाची शांतता व सुव्यवस्था , शांतता समिती सदस्य अशा अनेक मुद्यांवर चर्चा केली. तसेच केंद्र शासनाच्या नशआमुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थ मुक्त गाव ही संकल्पना राबवून अंमली पदार्थांच्या दुष्परिणाम व धोक्या विरूध्द लढण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन केले.

दरम्यान, गावातील बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपल्बध व्हावा या साठी कार्यशाळेत विविध संस्थेच्या प्रतिनिधींना बोलावत पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करण्यात आले. मान्यवरांनी पोलीस पाटील यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.