नाशिक – हत्येच्या गुन्ह्यातील संशयित महेश सोनवणे उर्फ चिमण्या याची जामिनावर सुटका होताच समर्थकांनी नाशिकरोड कारागृहाबाहेर पुष्पहार घालून, खांद्यावर बसवून स्वागत करुन मिरवणूक काढली. धारदार शस्त्र बाळगून टोळके रस्त्यावरील नागरिकांच्या अंगावर धावून गेले. दहशत निर्माण केली. गुन्हेगाराच्या स्वागत मिरवणुकीच्या चित्रफिती समोर आल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. आणि नाशिकरोड परिसरात त्यांची वरातच काढली.
शहरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत असून मागील नऊ महिन्यांत ४२ हत्या झाल्या आहेत. टोळीयुद्धातून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान मिळत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिक दहशतीखाली असताना कारागृहातून सुटलेल्या हत्येच्या गुन्ह्यातील संशयिताची टोळक्याने मिरवणूक काढण्यापर्यंत हिंमत गेली. अंबड पोलिसांच्या हद्दीत हत्येच्या गुन्ह्यात संशयित महेश सोनवणे उर्फ चिमण्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होता. जामिनावर त्याची सुटका होताच समर्थकांनी पुष्पहार घालून त्याचे स्वागत केले. खांद्यावर बसवून कारागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहनापर्यंत आणले. रस्त्याने मार्गस्थ होताना समर्थकांकडे हातात धारदार शस्त्रे होती. टोळक्याने अन्य वाहनधारकांना मज्जाव केला. काहींच्या अंगावर ते धावून गेले. या मिरवणुकीच्या चित्रफिती समाजमाध्यमांत प्रसारित झाल्याचे सांगितले जाते.
याची गंभीर दखल घेत पोलिसांनी चिमण्याच्या मिरवणुकीत कोण, कोण पाहुणे आले होते, त्यांचा शोध घेणे सुरु केले. प्रतिक सोनवणे, यश गिते, उमेश फसाळे, प्रमोद सावडेकर, श्रवण पगारे, सुमित बगाटे, मुन्ना साळवे, रामू नेपाळीसह १५ ते २० जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन चित्रफितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. २२ जणांना ताब्यात घे्ण्यात आले. यातील पाच जण अल्पवयीन असल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयित टोळके हत्येचा बदला घेतल्याचा जल्लोष करीत होते. काहींनी धारदार शस्त्रे बाळगली होती. टोळक्याची नाशिकरोड परिसरातून धिंड काढण्यात आली.
दरम्यान, सातपूरच्या श्रमिकनगर भागात टोळक्याने २४ सप्टेंबर रोजी रात्री जगदीश वानखेडे (३०) या युवकाची हत्या केली होती. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत सीसीटीव्हीच्या आधारे आदित् उर्फ बाबू यादव (१८), साहिल गांगुर्डे (२०), श्रावण वाघ (१८), समीर उर्फ बिट्या मेश्राम, राहुल सिंह (२१) यांच्यासह १० संशयितांना ताब्यात घेतले. यातील पाच जण अल्पवयीन आहेत. संशयितांची श्रमिकनगर, माळी कॉलनी परिसरात धिंड काढण्यात आली. ढासळती कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारीचा उंचावणारा आलेख या विषयावरून मध्यंतरी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने संयुक्त मोर्चा काढला होता. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात बैठक घेतली. गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे, तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.