नाशिक – येथील प्रगतिशील लेखक संघाची नव्वदी आणि नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने पाचवे नाशिक जिल्हा प्रगतिशील साहित्य संमेलन नऊ नोव्हेंबरला गंगापूर रोडवरील आय.एम.आर.टी. सभागृहात भरविण्यात येणार आहे.

संमेलनाध्यक्ष कवी, संशोधक, अभ्यासक प्रा. सचिन गरुड तर, स्वागताध्यक्ष डॉ. वंदना कावळे हे आहेत. दोन नोव्हेंबर हा शरदचंद्र मुक्तीबोध यांचा स्मृतिदिन तर पाच नोव्हेंबर प्रगतिशील लेखक संघाचे संस्थापक सज्जाद जहीर यांचा स्मृतिदिन. हे औचित्य साधून नऊ नोव्हेंबरला संमेलन होत आहे. मुन्शी प्रेमचंद यांच्या अध्यक्षतेखाली पहिले प्रगतिशील अधिवेशन लखनऊ येथे १९३६ मध्ये झाले होते. त्याचे उद्घाटन रवींद्रनाथ टागोर यांनी केले होते.

प्रगतिशील संघाने लेखकाने राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राकडे कसे पाहावे, याचा वस्तूपाठ घालून दिला आहे. इप्टा ही प्रगतिशील लेखक संघाचीच शाखा आहे. यातील अनेक सिनेमा कलावंत, कवी, गीतकार यांचा प्रभाव सिनेमासृष्टीवर राहिला आहे. प्रगतिशील लेखकांचा वारसा लोकांपर्यंत घेऊन जाणे, हा या प्रगतिशील साहित्य संमेलनाचा उद्देश आहे. उद्घाटन, प्रगतिशील सन्मान सोहळा, परिसंवाद आणि कवी संमेलन असे संमेलनाचे स्वरूप आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अहिरे, सचिव प्रल्हाद पवार, कार्याध्यक्ष अरुण घोडेराव यांनी केले आहे.

संमेलनात सकाळी ९. ३० वाजता इप्टा सांस्कृतिक चळवळ प्रबोधन गीते सादर करण्यात येणार आहेत. उद्घाटन सत्र १० ते १२. ३० या वेळेत होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. नितीन ठाकरे, प्रा. डॉ. विलास देशमुख, राजू देसले, डॉ. मनीषा जगताप उपस्थित राहणार असून राज्य कर उपायुक्त ज्ञानेश्वर मोरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. प्रगतिशील सन्मान सोहळ्यात सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार होणार आहे.

सन्मान सोहळा १२. ३० ते एक या वेळेत सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान होणार आहे. दुसरे सत्र दोन ते ३. ३० या वेळेत होणार आहे. ‘ साम्यवादी विचारांच्या प्रभावात भारतीय साहित्याची जनवादी वाटचाल ‘ हा परिसंवादाचा मुख्य विषय आहे. परिसंवादाचे अध्यक्ष सुरेश केदारे असून सहभागी वक्ते किशोर मांदळे हे आंबेडकरी चळवळ आणि साहित्याच्या अंगाने मांडणी करतील. महादेव खुडे हे स्त्रीदास्य मुक्ती चळवळ आणि साहित्य या विषयावर मार्गदर्शन करतील.

कवी संमेलनाचे तिसरे सत्र ३. ३० ते ५. ३० या वेळेत होणार असून कवी संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक प्रा.सुदाम राठोड असतील. काशिनाथ वेलदोडे, देवचंद महाले, निशांत गुरु, सिल्केषा अहिरे, गंगा गवळी, तानाजी सावळे असे अनेक कवी कविता सादर करतील. कवी संमेलनाचे सूत्रसंचालक रविकांत शार्दुल तर, समन्वयक अरुण घोडेराव असतील. संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अहिरे, सचिव प्रल्हाद पवार, कार्याध्यक्ष अरुण घोडेराव, इप्टा सांस्कृतिक चळवळीचे तल्हा शेख यांनी केले आहे.

पाचवे नाशिक जिल्हा प्रगतिशील साहित्य संमेलन नऊ नोव्हेंबरला होणार आहे. प्रगतिशील सन्मान सोहळा, परिसंवाद आणि कवी संमेलन असे संमेलनाचे स्वरूप आहे. पुस्तक, रांगोळी, चित्रकला प्रदर्शन, सेल्फी पॉईंट, भित्तीचित्र प्रदर्शनही होणार आहे.