नाशिक – जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून एक ते २३ जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीतील सर्वसाधारण १३४ मिलीमीटर पावसापेक्षा यंदा अधिक आहे. गेल्या वर्षी सरासरी १०४ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा त्यापेक्षाही कितीतरी अधिक पाऊस झाला. इगतपुरी आणि मालेगाव या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित १३ तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. निफाड आणि दिंडोरीत हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे.
ऐन उन्हाळ्यात वादळी पावसाला तोंड देणाऱ्या नाशिक जिल्ह्यात पावसाच्या हंगामाची सुरुवात त्याचप्रकारे झाली. या महिन्यात प्रारंभापासून अविरतपणे पाऊस कोसळत आहे. कधी अतिवृष्टी तर, कधी संततधार असे त्याचे स्वरुप आहे. बुधवारी संततधार सुरू होती. मध्यंतरी घाटमाथ्यावरील भागात अतिवृष्टी झाली होती. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत १२६ टक्के पाऊस झाला आहे.
निफाड आणि दिंडोरी तालुक्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडला. निफाड तालुक्यात आतापर्यंत १६५ मिलीमीटरची नोंद झाली. या कालावधीत निफाडमध्ये साधारणत: ७९ मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो. यंदा हे प्रमाण सरासरीच्या २१० टक्के इतके आहे. दिंडोरी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. आतापर्यंत या तालुक्यात १९६ मिलीमीटर पाऊस पडला असून सरासरीच्या तुलनेत त्याची टक्केवारी १९४ इतकी आहे. दुष्काळी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस आहे. नांदगाव (१३१ टक्के), येवला (१५९), सिन्नर (१५७), देवळा (१०८ टक्के) आणि चांदवड तालुक्यात (१४१ टक्के) पाऊस झाला. मालेगाव तालुक्यात सरासरीच्या कमी म्हणजे (९० टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
इगतपुरीमध्ये या कालावधीपर्यंत सर्वसाधारपणे ३८१ सर्वसाधारण पाऊस पडतो. तिथे ३२६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. म्हणजे वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी म्हणजे ८६ टक्के पाऊस पडला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात २३ जूनपर्यंत साधारणत: २४४ मिलीमीटर पाऊस पडतो, तिथे ४३९ मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत १८१ टक्के पाऊस अधिक झाला. सुरगाणा तालुक्यात (११७ टक्के), पेठ (१४८ टक्के), नाशिक (१७६ टक्के पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय स्थिती
आतापर्यंत इगतपुरीचा अपवाद वगळता इतर घाटमाथ्यावरील भागात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी सात मिलीमीटर पाऊस झाला. एक ते २३ जून या कालावधीत सर्वाधिक ४३९ मिलीमीटर पावसाची नोद त्र्यंबकेश्वर तालुक्यात झाली आहे. त्या खालोखाल पेठ (३३२ मिलीमीटर), इगतपुरी (३२६), सुरगाणा (२४२), नाशिक (२०८), दिंडोरी (१९६), निफाड (१६५), सिन्नर (१४९), चांदवड (१४५), येवला (१४०), कळवण (१३५), बागलाण (१०६), देवळा (८७), आणि मालेगाव तालुक्यात (७३) मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
गतवर्षीपेक्षा ४७ टक्के अधिक पाऊस
गतवर्षी या कालावधीत जिल्ह्यात १०४ मिलीमीटर पाऊस पडला होता. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ७८ टक्के होते. त्याचा विचार करता यावेळी सरासरीच्या तुलनेत ४७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मागील वर्षी आठ तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. उर्वरित सात तालुक्यात हे प्रमाण बरेच कमी होते. यंदा दोन तालुके वगळता सर्व तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.