नाशिक – राज्यभर पावसाचा कहर सुरू असताना नाशिकमध्ये मात्र तो अगदीच रिमझिम स्वरुपात हजेरी लावत होता. महिनाभरापासून अंतर्धान पावलेल्या मुसळधार पावसाची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली. रात्रीपासून अनेक भागात संततधार सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने बुधवारी सकाळी गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आला. मुकणे व दारणा धरणाचेही दरवाजे उघडण्यात आले आहे.
राज्यात मराठवाडा, कोकण, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. या काळात नाशिकमध्ये फारसा पाऊस नव्हता. हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु, मंगळवारी सायंकाळपर्यंत हलकासा शिडकावा वगळता पाऊस झाला नाही. जून ते जुलैच्या मध्यापर्यंत म्हणजे दीड महिना जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. एक जून ते १५ जुलै रोजी सरासरीच्या तुलनेत १०५. ८ टक्के पावसाची नोंद झाली होती. हंगामाच्या सुरुवातीला असा पाऊस होण्याची ही मागील काही वर्षातील पहिलीच वेळ ठरली. या काळात पावसाने जनजीवन अनेकदा विस्कळीत झाले.
लहान-मोठी बहुतांश धरणे तुडूंब भरण्याच्या स्थितीत पोहोचली. जुलैच्या मध्यानंतर त्याने उघडीप घेतली. तेव्हापासून पावसाचा जोर ओसरला होता. परिणामी, सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी होऊन ७५ टक्क्यांवर आले. मंगळवारी रात्री त्याचे पुनरागमन झाले. सलग आठ ते नऊ तासांपासून पाऊस कोसळत आहे. रात्रीपासून सकाळी आठ वाजेपर्यंत शहर परिसरात ४४.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. संततधारेमुळे सखल भागातील रस्त्यांवर पाणी आले आहे.
गंगापूर, दारणा, मुकणे धरणातून विसर्ग
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने बुधवारी सकाळी आठ वाजेपासून गंगापूर धरणातून ५०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. नंतर तो दीड हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला असून पाऊस कायम राहिल्यास यामध्ये आणखी वाढ केली जाईल असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. दारणा धरणातून ११०० क्युसेक तर मुकणे धरणातून सकाळी ५०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे.
गोदा काठालगत आठवडे बाजारास प्रतिबंध
गंगापूर धरणातून गोदावरीच्या पात्रात विसर्ग केला जात आहे. शहरात गोदा काठालगत बुधवारी आठवडे बाजार भरतो. गोदावरीच्या पातळीत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे नदी पात्रालगत भाजी विक्रेत्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. पात्रात वा पात्रालगत बुधवारचा आठवडे भरवू नये, असे आवाहन यंत्रणेने केले आहे.
पाटबंधारे विभागासमोर आव्हान
धरण परिचालन सूचीनुसार पावसाळ्यात कोणत्या महिन्यात किती जलसाठा असावा, हे निश्चित असते. त्यानुसार अतिरिक्त पाणी सोडावे लागत आहे. एरवी ही प्रक्रिया हंगामाच्या अखेरीस घडते. तेव्हा धरणे भरण्याच्या स्थितीत असतात. यंदा मात्र ही प्रक्रिया सुरुवातीला झाल्यामुळे पाटबंधारे विभागाला आता सतर्कता बाळगावी लागत आहे. कारण, गंगापूरसह अन्य प्रमुख धरणे तांत्रिकदृष्ट्या भरण्याच्या स्थितीत आहे. धरणात अकस्मात येणारे पाणी साठविण्यासाठी फारशी जागा नाही. यामुळे धरण सुरक्षित राखण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करताना खालील भागात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.