नाशिक – महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची स्वतंत्रपणे तयारी करीत असताना निवडणूक ते स्वतंत्रपणे लढतील काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपची प्रमुख महापालिकांमध्ये एकट्याचे साम्राज्य असावे, ही महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळेच वरकरणी त्यांच्याकडून महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जाण्याचे सांगितले जात असले तरी त्यांची तयारी मात्र स्वबळाची दिसत आहे.
त्यामुळेच नाशिक महापालिका निवडणुकीत शंभर प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवत त्यासाठी भाजपकडून साम-दाम-दंड या पध्दतीने प्रयत्न होत असताना दुसरीकडे, मित्रपक्ष शिवसेनेची (एकनाथ शिंदे) कोंडी झाली आहे. त्यामुळेच महापालिका निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढविण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांना जाहीर करावे लागले.
नाशिक येथे रविवारी सायंकाळी शिंदे गटाची बूथ प्रमुख कार्यशाळा आणि कार्यकर्ता, पदाधिकारी मेळावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करण्यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी काय करावयास हवे, याविषयी मार्गदर्शन केले.
निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या आहेत. निवडणुका कशा जिंकायच्या हे आम्हांला चांगले माहीत आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदार यादीवर सुरुवातीला काम केले पाहिजे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांनी आमदार, खासदारांना निवडणुका जिंकून दिल्या आहेत. आता कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकू देण्याची जबाबदारी सर्व आमदार, खासदार, मंत्री यांची आहे. त्यासाठी मतदार यादीवर लक्ष केंद्रित करा. आपण प्लसमध्ये राहू हे पाहतानाच विरोधक मायनसमध्ये राहतील, हे बघितले पाहिजे. अचूक मतदार यादीत तुम्हाला जिंकून देईल. विरोधकांकडून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
कार्यकर्त्यांना जिंकण्याचा कानमंत्र देताना एकनाथ शिंदे यांनी कुठेही स्वबळाचा उल्लेख केला नाही. एवढेच नव्हे तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवाच फडकणार, असा विश्वास व्यक्त केला. एवढेच नव्हे तर, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाही महायुतीच्या कोणत्याही नेत्याविषयी वादग्रस्त वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला. यावरुन शिवसेना आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढण्यासाठी आग्रही असल्याचे स्पष्ट होत आहे.
दुसरीकडे, भाजपचे नेते मात्र महायुती म्हणून निवडणूक लढविण्याचे सांगत असले तरी युती न झाल्यास स्वतंत्र लढण्यात येईल, असा सावध पवित्राही घेत आहे. त्यामुळेच, जळगावमध्येही पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी भाजप महायुती म्हणूनच निवडणूक लढविणार असे जाहीर का करीत नाही, असे आवाहन केले आहे.
