नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका मातेची यात्रा भरली आहे. शहरात भरणारी यात्रा असल्याने तिचे अप्रूप सर्वानाच असते. यात्रोत्सवानिमित्त श्री कालिका माता मंदिर भक्तांनी गजबजले आहे.

श्री कालिका माता मंदिर जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर आहे. पाहताक्षणी ही वास्तु नवीन वाटत असली तरी या मंदिराला मोठा इतिहास आहे. १७ व्या शतकात नाशिकचे पोलीस पाटील चिमणराव रंगोजी पाटील यांच्या शेतात हे मंदिर होते. १७०५ मध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोध्दार केला. असे ऐतिहासिक वारसा लाभलेले कालिका माता देवस्थान खऱ्या अर्थाने वेगळे ठरते ते येथील तीन देवींच्या मूर्तीमुळे. मंदिरात कालिका मातेसह महालक्ष्मी, महासरस्वती यांच्या मूर्ती आहेत.

नाशिकमधून जाणाऱ्या जुन्या आग्रा रोडवरील श्री कालिका माता मंदिर पुरातन आहे. १७०५ मध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोध्दार केला. पूर्वीचे मंदिर १० बाय १० अशा आकारात होते. त्या ठिकाणी भाविकांच्या सेवेसाठी बारवही बांधण्यात आली होती. सुरूवातीला या ठिकाणी केवळ कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने महासरस्वती यांची मूर्ती भेट देण्यात आली, नंतर महालक्ष्मीची मूर्तीही आली. तीन्ही मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिरात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती आणि कालिका माता यांची मूर्ती आहे. देवीच्या पायाखाली तीन राक्षसांचे डोके आहे. कालिका देवीच्या उजव्या हातात तलवार, डाव्या हातात डमरू आणि खडग आहे. स्वातंत्र्यपूर्वकालिन म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या काळात या ठिकाणी सभा घेतल्या जात.

सीमोल्लंघनासाठी देवस्थानपर्यंत लोक ये-जा करत. यानंतर हळूहळु याठिकाणी यात्रा भरू लागली. पूर्वी कालिका मंदिरातील भाग अतिशय लहान होता. यात्रेच्या वेळी भाविकांना दर्शन घेतांना अडचण होई. तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या पुढाकाराने मग दुरुस्ती करण्यात आली. गुलाबराव पाटील यांच्याकडे विश्वस्तपद आल्यानंतर मंदिराचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास झाला. सद्यस्थितीत मंदिराचे विशाल रुप भाविकांच्या डोळ्यात भरते. मंदिराचा गाभारा, तसेच शिखर भव्य आहे. भाविकांना दर्शनासाठी सभामंडप, बाहेर बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या आवारातील दीपमाळ सर्वांचे लक्ष वेधून घेते.

मंदिरात नवरात्र उत्सवात नऊ दिवस विविध कार्यक्रम चालतात. चैत्र पौर्णिमेलाही या ठिकाणी गर्दी होते. हे मंदिर ज्या ठिकाणी आहे. त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रुग्णालये आहेत. देवस्थानच्या वतीने या ठिकाणी बाहेरगावहून येणाऱ्या रुग्णांसाठी तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी अल्पदरात भोजन तसेच निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. मंदिर विकास निधीसाठी देवस्थानच्या वतीने ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही तसेच सुरक्षा रक्षकांची व्यवस्था आहे. नाशिकचे ग्रामदेवत असलेल्या श्री कालिका माता मंदिराचे रुप नवरात्रौत्सवानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आल्याने खुलले आहे.