नाशिक – भ्रमणध्वनीवरील ऑनलाईन गेम खेळण्याचे वेड आता मुलांना आत्महत्येपर्यंत खेचू लागले आहे. नाशिकमध्ये घडलेल्या घटनेवरुन हेच दिसते. ऑनलाईन खेळण्यात सतत दंग राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाने या खेळात पैसेे हरल्याच्या अस्वस्थेतून रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सम्राट भालेराव (१६) असे या मुलाचे नाव आहे. सम्राटच्या वडिलांचे १३ वर्षांपूर्वी निधन झाले होते. आई लहान मुलांना सांभाळण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. सम्राटला दोन बहिणी आहेत. मोठी बहीण अकरावीत तर, लहान इयत्ता नववीत शिक्षण घेते. सम्राट घरातील एकुलता एक मुलगा होता. भविष्यात कुटुंबाची त्याच्यावर जबाबदारी होती. ऑनलाईन गेमच्या नादात कुटुंबाचा आधार गमावल्याची भावना नातेवाईकांंनी व्यक्त केली.
जयभवानी रस्त्यावरील डायमंड रो हाऊसमध्ये ही घटना घडली. सम्राट हा वडनेर येथील केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी होता. इयत्ता दहावीत दोन विषयात तो अनुत्तीँर्ण झाला. उत्तरपत्रिका फेरपडताळणीसाठी त्याने अर्ज केल्याचे सांगितले जाते. १५ जुलै रोजी राहिलेल्या विषयांची तो परीक्षा देणार होता. तत्पुर्वीच भ्रमणध्वनीवरील ऑनलाईन गेमच्या नादात त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.
रात्री तो घरातील वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेला. तिथे तो भ्रमणध्वनीवर ऑनलाईन गेम खेळत बसला. सकाळी काका ज्ञानेश्वर भालेराव हे त्याच्या खोलीत गेले असता सम्राटने गळफास घेतल्याचे दिसले. कुटुंबियांनी सम्राटला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांनी सम्राट हा ऑनलाईन गेम खेळत होता, यात काही आर्थिक नुकसान झाले असावे, यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सम्राट आईचा भ्रमणध्वनी वापरत होता. या भ्रमणध्वनीत तो कोणते खेळ खेळत होता, कोणत्या खेळात पैसे अडकवले, याची छाननी तपास यंत्रणेकडून केली जाणार आहे. त्यानंतर तक्रारीत तथ्य आहे की नाही, याची स्पष्टता होईल असे यंत्रणेकडून सांगण्यात आले.