नाशिक – महापालिकेची विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि पंपिंग स्टेशन येथील विकास कामे तसेच जलवाहिनीच्या कामांसाठी शनिवारी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

ऐन पावसाळ्यात महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी कामे करणार असल्याने शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. मागील आठवड्यात शनिवारी पाथर्डी जलशुध्दीकरण केंद्रातून ज्या भागात पाणी पुरवठा होतो, त्या नाशिक पूर्व आणि नवीन नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन झाले होते.

परंतु, तत्पूर्वीच महावितरणच्या रेमंड उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे मुकणे धरणातून पाणी उचलणाऱ्या केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी शुक्रवारी अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. सिडको आणि नाशिक पूर्व भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले नव्हते. यामुळे महावितरणने शनिवारचे देखभाल दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन रद्द केल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत राहिला. आता या शनिवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनपाचे जलशुध्दीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशन येथे स्मार्ट सिटी कंपनी शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत विविध कामे करणार आहे. त्यामध्ये नवीन व्हॉल्व्ह बसविणे, प्रवाह मीटर (फ्लो मिटर) आदींचा समावेश आहे. याच वेळी जलवाहिनीची कामे केली जातील. यामुळे शनिवारी शहराचा दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.