नाशिक : नाशिक ते ओझर दरम्यान महामार्गावरील दहावा मैल येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा धुळे, सटाणा, नंदुरबार, चांदवड, पिंपळगावकडे जाणाऱ्या वाहनधारकांना तसेच धुळे, मालेगावकडून नाशिककडे येणाऱ्या वाहनधारकांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी या कोंडीत शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांच्या बिऱ्हाड मोर्चाने भर टाकली.
नाशिक ते ओझर दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. सोमवारी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार संघटनेचे राज्यातील ७०० हून अधिक कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरले. या कर्मचाऱ्यांनी दहावा मैल येथे आंदोलन करुन मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी वाहतूक ठप्प होऊन नाशिक आणि चांदवड बाजूकडे पाच किलोमीटरहून अधिक दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अनेक महिन्यांपासून या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दहाव्या मैलावर तासंतास वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास होतो. अवजड वाहनांमुळे प्रामुख्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले असून, यासंदर्भात ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. गुंतागुंतीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून दोन ते तीन दिवसात येथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याने वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होईल.- आ. दिलीप बनकर