नाशिक : सोमवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवा निमित्त शहराचे ग्रामदैवत श्री कालिका माता तसेच भगूर येथील रेणुका देवी मंदिर परिसरात उत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी पाहता वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
मुंबई नाका येथील श्री कालिका देवी मंदिर परिसरात होणाऱ्या नवरात्र उत्सवास आदिवासी बिऱ्हाड मोर्चाचा अडसर राहणार आहे. वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात सोमवारपासून दोन ऑक्टोबर या कालावधीत वाहतुक मार्गात बदल केला असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली. याअंतर्गत गडकरी सिग्नल ते हॉटेल रुची हा रस्ता तसेच तसेच जोड रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
चांडक सर्कल ते हॉटेल संदीपपर्यंत तसेच जोडरस्त्यावर सर्व वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. गडकरी सिग्नलकडून मुंबई नाक्याकडे जाणारी हलकी वाहने ही गडकरी सिग्नल, सारडा सर्कल मार्गे जातील.भवानी सर्कलकडून सिबल फर्निचरमार्गे मुंबई नाक्याकडे जाणारी वाहतूक ही भवानी सर्कल-सिबल फर्निचर-तिडके कॉलनी रोड नंदिनी नदी पूल-आर.डी.सर्कल, गोविंदनगर, इंदिरानगर जॉगींग ट्रॅकमार्गे इतरत्र जाईल.
चांडक सर्कलकडून संदीप हॉटेलकडे जाणारी हलकी वाहने चांडक सर्कल -गडकरी सिग्नल-शिंगाडा तलाव-सारडा सर्कलमार्गे इतरत्र जातील. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या बस, सिटी लिंक बस आणि इतर सर्व प्रकारची वाहने ही मोडक चौक सिग्नल वरून खडकाळी सिग्नलमार्गे ६० फुटीरोडने द्वारका सर्कल मार्गाने नाशिकरोड, सिडको तसेच इतरत्र जातील. मुंबई नाक्याहून शहरात येणारी हलकी वाहने महामार्ग बसस्थानक टॅक्सी स्टॅण्ड , तुपसाखरे लॉन्स, हुंडाई शोरूम समोरून चांडक सर्कल-भवानी सर्कल या मार्गाने त्र्यंबक रोडने शहरात येतील. तसेच शहरातुन अंबड, सातपुर परिसरात जाणारी वाहने ही द्वारका सर्कलवरून गरवारे टी पॉईन्ट या मार्गाने सातपर आैद्योगिक वसाहत परिसरात जातील. द्वारका सर्कलवरून पंचवटीकडे जाणारी जड वाहने ही कन्नमवार पूल, संतोष टी पॉईंन्ट, रासबिहारी स्कुल या मार्गावरून पंचवटीकडे जातील.
दरम्यान, भगूर येथील रेणुकादेवी मंदिर येथे होणाऱ्या नवरात्र उत्सव काळात भाविकांची गर्दी पाहता या ठिकाणी रेस्ट कॅम्प रोड, केंद्रिय विद्यालय ते जोशी हॉस्पिटलपर्यंतचा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. वाहनचालकांनी गर्दीची ठिकाणे सोडून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.