नाशिक – नवरात्रोत्सवानिमित्त पहिल्या दिवसापासून जिल्ह्यातील सप्तशृंग गडावरील सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. हे देवस्थान साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात.

कळवण तालुक्यातील नांदुरी या गावाजवळ सप्तश्रृंग गड आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. हे स्थान नाशिकपासून उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण रस्त्यावर आहे. सह्याद्रीच्या पूर्व – पश्‍चिम डोंगररांगेत हा गड आहे. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे.

गडावर माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गडाला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदुरी गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने ४७२ पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून, दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत. २०१८ पासून रज्जूमार्गाचा (फ्युनिक्युलर ट्राॅली) वापर सुरू झाल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला भाविकांची चांगली सोय झाली.

मंदिराच्या गाभाऱ्यात पोहचल्यानंतर गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. तसेच या ठिकाणी चैत्रोत्सव होतो. त्या वेळी उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक हे अनवानी येतात. गडावर जात असतांना कालीकुंड, सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, शितकडा, गणपती मंदिर आणि गुरूदेव आश्रम या ठिकाणीही भाविक भेट देतात.

अकरा वार पैठणी, तीन वार खण

सप्तश्रृंगी देवीची मूर्ती नऊ फूट उंचीची आहे. देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार पैठणी / शालू प्रकारातील साडी नेसवली जाते. चोळीला तीन वार खण लागतात. डोक्‍यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.

आख्यायिका

दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख सापडतात. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी गडावर वास्तव्य केले. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की, राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला. आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदायमध्ये नवनाथ भक्तीसार या पोथीतही सप्तश्रृंगी देवीचा उल्लेख आढळतो.