नाशिक : सुमारे दीडशे एकर क्षेत्रावरील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. या ठिकाणी आंबे, चिकू, फणस, पेरू, लिची, नारळ, निलगिरी आदींची हजारो झाडे आहेत. निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या या परिसरात मुक्त विद्यापीठ अतिरिक्त शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी नारळाच्या ४७ झाडांचे दुसरीकडे पुनर्रोपण करीत आहे. नारळाच्या बागेत जिथे मोकळी जागा आहे, तिथे त्यांचे पुनर्रोपण केले जाईल, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे. या परिसरात बरीच मोकळी जागा असताना नव्या इमारतीसाठी नारळाची झाडे स्थलांतरीत करण्याच्या कृतीवर आक्षेप घेतला जात आहे.

शहरालगत गंगापूर धरणाला खेटून मुक्त विद्यापीठाचा विस्तीर्ण परिसर आहे. कृषी विज्ञान केंद्राने निम्म्याहून अधिक जागेवर बागायती शेतीचा समावेश असलेला फलोत्पादन प्रकल्प विकसित केला आहे. मुख्यालयात जवळपास १६ इमारती आहेत. त्यांचे क्षेत्रफळ ३६२६३ चौरस मीटर (नऊ एकर) इतके असल्याचे सांगितले जाते. ४३१२ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या शैक्षणिक विभागात आठ शाळा, शैक्षणिक सेवा विभाग, विज्ञान प्रयोगशाळा, सभागृह आहेत. तर जवळपास तितक्याच क्षेत्रफळाच्या परीक्षा इमारतीत परीक्षा नियंत्रक, प्री-कॅप सभागृह, स्कॅनिंग सुविधा, बैठक कक्ष, मूल्यांकन सभागृह आणि संचालक मूल्यांकन विभागाचे कार्यालय आहे.

अन्य एका संकुलात ग्रंथालय आणि संसाधन केंद्र आहे. आता नवीन शैक्षणिक इमारत बांधण्यासाठी फळे देणारी नारळाची झाडे स्थलांतरीत केली जात आहेत. मागील काही वर्षात विद्यार्थी संख्या कमी होत असताना शैक्षणिक संकुलाच्या विस्ताराविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. विद्यापीठ परिसरात सुमारे ४० एकर जागा मोकळी आहे. असे असताना नव्या शैक्षणिक संकुलासाठी नारळाची झाडे स्थलांतरीत करणे अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

एकतर मुक्त आणि दूरस्थ शिक्षणात व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवीन शैक्षणिक इमारतींची गरज नसते, कारण मुक्त विद्यापीठाच्या मुख्यालयातील इमारतीत किंवा वर्ग खोल्यात एकही विद्यार्थी शिकण्यास येत नाही. आहेत त्या इमारती पुरेशा आहेत. विद्यार्थी संख्या कमी होत असताना, अनावश्यक नवीन शैक्षणिक इमारत बांधण्यासाठी पैशाचा अपव्यय होतो. नारळाची झाडे स्थलांतर करण्यासाठी पण पैसा खर्च होईल. इतके सारे करून पुनर्रौपण केलेली झाडे जगतील याची काय शाश्वती ?, त्यामुळे नारळाची झाडांचे स्थलांतर करणे अतार्किक वाटते, असे मत मुक्त विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे माजी सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी व्यक्त केले.

विद्यापीठ परिसरातील बागेत नारळाची दोन हजार झाडे आहेत. एक एकरमध्ये झाडांचे जितके प्रमाण हवे असते, प्रत्यक्षात तितकी झाडे नाहीत. मधली बरिच जागा मोकळी आहे. अशा ठिकाणी ४७ नारळाच्या झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. विद्यापीठातील आठ शैक्षणिक शाळांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यांना सोयी सुविधा नाहीत. आधीच्या शैक्षणिक संकुलाजवळ त्या असणे आवश्यक आहे. मागील वर्षी विद्यापीठाने २७ नारळाच्या झाडांचे पुनर्रोपण केले होते. तेच तंत्र वापरून ४७ झाडे बागेतील मोकळ्या जागेत पुनर्रोपित केली जातील. पर्यावरण संरक्षणाचा विचार विद्यापीठाने केला असून वन विभागाची परवानगी घेण्यात आलेली आहे. – प्रा. संजीव सोनवणे (कुलगुरू,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ)