नाशिक – बरे झाले राज साहेबांना नाशिककरांनी नाकारले. त्यानिमित्ताने का होईना त्यांना कळले सत्ता हातात असलेल्यांनी दत्तक शहराची काय अवस्था केली. या दत्तक शहराची काय वाट लावली, याचा जाब विचारण्यासाठी तसेच सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदविण्यासाठी ठाकरे शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संयुक्त मोर्चा आहे. मोर्चा जनतेच्या प्रश्नांवर निघत आहे. यामध्ये सर्व पक्षातील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी केले.
नांदगावकर मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिक येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर उपस्थित होते. नांदगावकर म्हणाले, नाशिक ही राज ठाकरे यांची जन्मभूमी नसली तरी कर्मभूमी आहे. नाशिकविषयी त्यांना आंतरिक ओढ आहे. या ओढीतूनच केवळ ४० नगरसेवक असतांना शहरात बॉटॅनिकल गार्डन, गोदा पार्क असे प्रकल्प आणले. मात्र नाशिककरांनी राज ठाकरे यांना नाकारले यांची खंत वाटते.
मात्र ज्यांनी नाशिकला दत्तक घेतले त्यांनी याकडे गांर्भीयाने पहावे अशी मागणी नांदगावकर यांनी केली. शहरात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, शहराला अमली पदार्थाचा विळखा पडला आहे. शाळा-महाविद्यालय-टपरीपर्यंत अमली पदार्थ पोहचले. देशाचे भवितव्य धोक्यात असतांना मुख्यमंत्री काय करतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राज्यात शिक्षक, शेतकरी, असे अनेकांचे प्रश्न आहेत. याविषयी सत्ताधारी काय भूमिका घेतात, हा जाब मोर्चातून विचारला जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढला जात असल्याची टीका होत असली तरी हा जनतेच्या प्रश्नावर काढलेला मोर्चा आहे. निवडणुका आल्या की आरक्षणासह वेगवेगळे मुद्दे समोर येतात.
प्रत्येक गोष्टीचे राजकीय लोक राजकारण करतात. मात्र जनतेचे हित जपले गेले पाहिजे. कुंभमेळा काही वर्षांवर आलेला असतांना शासन म्हणते कामे झाली. पण दिसत नाही. अजुनही मुख्यमंत्र्यांना चांगले काम करण्याची संधी आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळेल पण शहरातील उध्दवस्त झालेले प्रकल्पही नव्याने सुरू होतील. प्रवीण गेडाम सारखा सक्षम अधिकारी या ठिकाणी आहे. त्यामुळे कामे चांगलीच होतील हा विश्वास आहे.
हा मोर्चा शक्ती प्रदर्शन नाही. जनतेच्या प्रश्नावर दोन नेते एकत्र आले आहेत. भविष्यात ते एकत्र येतील, त्यांची युती होईल, हे आता सांगता येत नाही. निवडणुका येत-जात राहतील, पण जनतेच्या प्रश्नावर काम होणे गरजेचे आहे. ते जो कोणी करेल त्यांचे आम्ही कौतुक करू. आरक्षण हे आर्थिक निकषांवर दिले जावे, मग तो कुठल्याही घटकाचा असेल, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.