मालेगाव : दुष्काळ जाहीर करताना प्रशासनाकडून सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) सोमवारी सटाण्याचे तहसिलदार कैलास चावडे यांना घेराव घालण्यात आला. मंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करताना तत्परता दाखवली जाते, परंतु,अन्य तालुक्यांच्या बाबतीत तशी तसदी घेतली जात नाही,अशी व्यथा आंदोलकांनी मांडली.

माजी आमदार संजय चव्हाण आणि पक्षाचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांच्या नेतृत्वाखाली हा घेराव घालण्यात आला. ‘ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, बळीराजाला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यंदाच्या पावसाळी हंगामातील अखेरच्या चरणात अतिवृष्टीचा जो तडाखा बसला,त्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पाण्यात दुभती जनावरे,धान,कांदा,फळबागा,घरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. हताश झालेल्या या शेतकऱ्यांना भविष्याची आणि भाकरीची देखील चिंता सतावू लागली आहे,अशा शब्दात आंदोलकांनी शेतकऱ्यांचे दुःख कथन केले.

मंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये तात्काळ दुष्काळ जाहीर केले जात असताना इतर ठिकाणी मात्र अशी तत्परता दाखवली जात नाही, याबद्दल आंदोलकांनी खेद व्यक्त करत अशा तालुक्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित व्हावे लागत असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची ओरड यावेळी करण्यात आली. जोपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, त्याचे भविष्य पाण्यात गेले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मदत केली नाही,तर परिस्थिती अधिकच गंभीर होईल,अशी भीती देखील यावेळी व्यक्त केली गेली.

यावेळी आंदोलकांच्या वतीने शासनाला देण्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपये मदत द्यावी, मृत जनावरांसाठी पुरेशी नुकसान भरपाई द्यावी,कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी,नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी किमान १० लाख रुपये भरपाई द्यावी,पीकविमा कंपन्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत,शेतकरी,शेतमजूर व बारा बलुतेदार वर्गासाठी विशेष पुनर्वसन पॅकेज द्यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. या आंदोलनात शहराध्यक्ष भारत काटके,छोटू सोनवणे,विजयराज वाघ,सुमित वाघ, महिला तालुकाध्यक्ष उषाताई भामरे, वंदना बिरारी,चेतन वनीस,किरण पाटील, युवराज निकुंभ, संजय वाघ शिरसमणीकर, झिपरू सोनवणे, दिलीप सोनवणे, विलास सोनवणे, जनार्दन सोनवणे, बापू बागुल,अनिल चव्हाण, आबा इंगळे, भाऊसाहेब सूर्यवंशी आदी सामील झाले होते.