सत्ताधाऱ्यांनी जनतेलाच राम समजून त्यांची सेवा करायला हवी. मंत्रिमंडळ घेऊन अयोध्येला जाणे, गुवाहाटीला जाणे हे पुरोगामी महाराष्ट्राला न रुचणारे आहे. आम्ही देखील रामभक्त आहोत. मुख्यमंत्र्यांनी स्वत: एकटे जाऊन काय दर्शन घ्यायचे ते घ्यावे, पूजा करावी, मंत्र म्हणावेत. मंत्रिमंडळ तिथे घेऊन जायचे आणि महाराष्ट्राचा वेळ खर्च करायचा असा हा प्रकार आहे. परंतु, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना प्रस्तावित अयोध्या दौऱ्यावरुन टोला हाणला. जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पाटील यांनी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यात महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. मराठवाड्यात प्रथमच महाविकास आघाडी एकत्र येणार असून ही सभा फार मोठी होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. अशा सभा सर्व विभागात घेतल्या जाणार आहेत. सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहतील की नाही, याबद्दल अद्याप चर्चा झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आमची प्राथमिकता महाविकास आघाडीलाच आहे. महाविकास आघाडी टिकावी, हीच आमच्या पक्षाची आणि शरद पवारांची इच्छा आहे. आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या असून शक्यतो सर्व ठिकाणी महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा अतिशय सावळा गोंधळ सुरू आहे. मंत्री विधानसभेच्या सभागृहात देखील नसतात, हे लोकांना काय भेटणार, असा प्रश्न त्यांनी केला. विधानसभेत लक्षवेधीला अनेक मंत्री गैरहजर असतात. अधिवेशनात अशी अनेक उदाहरणे आम्ही पाहिली आहेत. मंत्रिमंडळ महाराष्ट्रातील जनतेसाठी नव्हे तर, त्यांच्या हितासाठी आहे. त्यामुळे जनतेला आता त्यांनी भेटावे, यासाठी प्रयत्न करायला लागले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात जर संबंधित आमदार अपात्र ठरले तर या सरकारला राहता येणार नाही. सरकारच राहिले नाही तर राष्ट्रपती राजवटीशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी मांडली. हेही वाचा >>>थकबाकीमुळे विद्यालयाविरुद्ध धुळे मनपाची कारवाई भाजपचा स्तर ढासळतोय आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासारखे लोक भाजपने गोळा केले आहेत. भाजपची प्रतिमा त्यातून मलिन होत आहे. असे सर्व लोक गोळा करून भाजपने आपला स्तर कुठे नेऊन ठेवलाय, हे महाराष्ट्र बघत आहे, असे जयंत पाटील यांनी पडळकर यांच्याविषयी उपस्थित झालेल्या प्रश्नावर सांगितले. राजकारणाच्या घसरत्या पातळीबाबत पाटील यांनी भाष्य केले. धोरणात्मक व तत्वाला विरोध इथपर्यंत मर्यादा योग्य आहे. मात्र व्यक्तिगत, लज्जा उत्पन्न होईल अशी टीका घृणास्पद आहे. राजकारणात चटकन पुढे जाणारा एक वर्ग प्रत्येक पक्षात असतो. तो असा आक्रस्ताळेपणा करीत असतो. माध्यमांचे लक्ष त्याला वेधून घ्यायचे असते. अशा लोकांचा गैरसमज असतो की त्या त्या पक्षाचे लोक त्यांना महत्व देतात. त्यांना हे लक्षात येत नाही की पक्ष त्यांचा वापर दुसऱ्याच्या अंगावर भुंकण्यासाठी करून घेतो. त्यांची पदे, त्यांची सत्ता, त्यांचा पाठिंबा कमी झाला की त्यांच्या लक्षात येते की आपण मोठी चूक केली आहे, असेही पाटील यांनी कुणाचा नामोल्लेख न करता वाचाळवीरांना सुनावले.