नाशिक – सत्तेसाठी सरकार जातीजातींमध्ये भांडण लावत आहे. मराठा समाजाला आरक्षण विषयक निर्णय घेतल्यानंतर ओबीसी घटक पुढे आला आहे. यानंतर अन्य काही समाज पुढे येतील. अशा स्थितीत आता सरकारची कसोटी आहे. आरक्षण कोणाला आणि कसे देणार, याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरही भाष्य केले.
नाशिक येथे शिबिराच्या पार्श्वभूमीवर, शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आरक्षणाविषयी राज्य सरकारमध्ये संभ्रम आहे. आरक्षणाचा विषय आल्यावर विरोधी पक्षालाही चर्चेसाठी बरोबर घ्यावे, असे सांगण्यात आले होते. मात्र सरकारने आरक्षण प्रश्नाविषयी मित्रपक्षालाही बाजुला ठेवले. आम्ही सत्तेत नसल्याने आरक्षणाविषयी आम्ही काय निर्णय घेणार, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. मतविभागणीचा विरोधकांना फायदा होईल, अशी कुठलीही कृती करणार नाही. मनसे-ठाकरे गट युती झाल्यास पुढील भूमिका शरद पवार घेतील, असे त्यांनी सांगितले.
सध्या सत्ताधाऱ्यांना निवडणुकीची भिती वाटत नाही. कारण, यंत्रणा नियंत्रित करीत आपल्या हवे तसे ते करून घेतात. यामुळे मत चोरी, इव्हीएम यंत्र घोटाळा अशी प्रकरणे समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला. असे झाल्यास काय पर्याय असेल या विषयी प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी की स्वतंत्र या विषयी शेवटपर्यंत निर्णय होत नसल्याने उशीर होतो. यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका याविषयी आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावे, असे सांगण्यात आले. तसेच हा मोर्चा झाल्यानंतर जे निवडणुकीसाठी इच्छुक आहे. त्यांनी मतदार याद्यांची छाननी करावी, घोटाळा वाटत असेल हरकत घ्यावी, अशी सूचना केली. निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीविषयी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला होता. त्यावेळी काही प्रश्न उपस्थित केले. मात्र आयोगाला त्याची उत्तरे देता आलेली नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
मतविभागणीचा विरोधकांना फायदा होईल, अशी कुठलीही कृती करणार नाही. मनसे आणि सेना युती झाल्यास शरद पवार याविषयी निर्णय घेतील, असेही शिंदे यांनी सांगितले. भारत-पाक सामन्याविषयी बोलताना शिंदे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा पहिला सामना आहे. लोकांच्या भावना ताज्या आहेत. अशा स्थितीत हा सामना घेण्याचा हट्ट का, असा प्रश्न उपस्थित केला.