लोकसत्ता वार्ताहर

धुळे : भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात तो एका गोठ्यात शिरला. हंड्यात तोंड टाकताच मान अडकल्याने बिथरला सैरभैर झाला. मध्यरात्री भांड्याचा खडखडाट ऐकायला आल्याने शेतकरी घराबाहेर आला. पाहतो तर काय, समोर बिबट्या… साक्री तालुक्यातील कोंडाईबारी या जंगल क्षेत्रातील घुकसेवड- जयरामनगर शिवारात रात्री हा प्रकार घडला. पावसाअभावी जंगल क्षेत्रातील वन्यप्राणी पाणी व अन्नाच्या शोधार्थ शेतीशिवाराकडे धाव घेत आहेत.

साक्री तालुक्यातील जयरामनगर शिवारात कृष्णा चौरे यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यात नेहमीप्रमाणे जनावरे बांधली आणि ते झोपी गेले.मध्यरात्री बारा ते दोन वाजेच्या दरम्यान तहानलेल्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला.समोरील तांब्याच्या हंड्यात मान टाकली. हंड्यात होते तेवढे पाणी प्यायल्यावर  बिबट्याची मान हंड्यातून निघेचना. यामुळे त्याने मानेला झटके दिले. तथापि त्याची मान हंड्यात पूर्णतः फसली. यामुळे बिबट्या अधिकच बिथरला. दिसत नसल्याने त्याला पळण्याचा अंदाजही घेता येईना.तोवर हंड्याचा आवाज शेतकरी कृष्णा चौरे यांना आला. त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले तर बिबट्याची मान हंड्यात अडकल्याचे त्यांना दिसले. त्यांनी  सरपंच कमलाकर साबळे यांना ही माहिती दिली. सरपंच साबळे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने ही माहीती दिली.

आणखी वाचा- नाशिक : पहिल्या दिवशी नक्कल करणारे दोन जण ताब्यात, विभागात दहावी परीक्षेला सुरुवात

कोंडाईबारीच्या वन परिक्षेत्राधिकारी सविता सोनवणे,वनपाल एस.जे. पाटील, एस.आर. देसले, कोंडाईबारीच्या वनपाल नीता म्हस्के, वनरक्षक गणेश बोरसे यांच्यासह वन खात्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाचे उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग, सहायक वनसंरक्षक अडकिने यांचे  मार्गदर्शन घेत वन विभागाने अखेर सुटकेसाठी कारवाई सुरु केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहिवेल (ता.साक्री) येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. यानंतर वन कर्मचाऱ्यांनी तांब्याच्या हंड्यातून बिबट्याची मान बाहेर काढली आणि त्याची रवानगी नैसर्गिक अधिवासात केली.