मनमाड – नवी दिल्ली ते मुंबई अशी वेगात धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या बोगीत तांत्रिक बिघाड झाल्याने मनमाड नजीक पानेवाडी रेल्वे स्थानकावर ही गाडी अर्धा ते पाऊण तास थांबवावी लागली. दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर केल्यानंतर ती मार्गस्थ झाली. मात्र त्यामुळे मागून येणाऱ्या मुंबईकडे धावणाऱ्या गाड्यांना अर्धा तास विलंब झाला.
सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली, नवी दिल्ली ते मुंबई राजधानी एक्स्प्रेस या गाडीला भुसावळ नंतर थेट नाशिकला थांबा आहे. सोमवारी ही गाडी वेगाने भुसावळकडून मनमाडकडे येत असतांना मनमाड नजीक पानेवाडी रेल्वे स्थानकाजवळ राजधानी एक्सप्रेसच्या ‘प्रेशर पाईप’मध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे गाडी अचानक थांबवावी लागली. गाडीला आपत्कालीन थांबा (इमर्जन्सी हॉल्ट) घ्यावा लागला आणि मुख्य म्हणजे मुख्य मार्गावर ही गाडी थांबली. भुसावळहून मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर ही गाडी थांबवावी लागली.
मनमाड येथून तातडीने यातायात आणि दुरुस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी प्रेशर पाईपच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. सुमारे ४० मिनिटानंतर हे काम पूर्ण झाल्यावर राजधानी एक्स्प्रेसने मनमाड होऊन नाशिककडे प्रस्थान केले. मात्र प्रेशर पाईपच्या तांत्रिक बिघाडामुळे राजधानी एक्सप्रेस पानेवाडी स्थानकात दाखल ३० ते ४० मिनिटे खोळंबून होती. काम झाल्यानंतर प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर ही गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली. राजधानी एक्स्प्रेसच्या तांत्रिक बिघाडाची झळ मागून येणाऱ्या आणि नाशिक व मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना अर्धा तास विलंब झाला. सकाळी भुसावळकडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या अधिक असते. देशाच्या विविध भागातील लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा यात समावेश असतो. या घटनाक्रमामुळे काही काळ रेल्वेगाड्या खोळंबल्या असल्या तरी मुंबईत त्या वेळेत पोहोचल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महिनाभरात दुसऱ्यांदा खोळंबा…
भुसावळ-मुंबई मार्गावर सकाळची वेळ खूप महत्त्वाची असते. कारण, देशातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईकडे मार्गस्थ होतात. काही दिवसांपूर्वी नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ सकाळी मालगाडीचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक अडीच ते तीन तास विस्कळीत झाली होती. सचखंड, दुरांतो, वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना त्यामुळे खोळंबा झाला होता. युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम झाल्यानंतर मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक सुरळीत झाली होती. सोमवारी राजधानी एक्स्प्रेसच्या तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा या मार्गावर तसाच खोळंबा झाला. अर्धा तासात दुरुस्तीचे काम झाल्यानंतर भुसावळ-मुंबई मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.