नाशिक : पैशांच्या लोभापोटी अनेकांशी बनावट विवाह लावून तरुणांची फसवणुक करणार्या दलालांसह नऊ जणांविरोधात धुळे येथील पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. संशयितांकडे अनेक बनावट आधारकार्ड आढळून आले असून या प्रकरणात वाशिम, यवतमाळ, अमरावती, नाशिक, मालेगाव येथील महिला, मुलींसह युवकांचा सहभाग आढळून आला आहे.

याबाबत शंकर पाटील (३८, रा.नकाणे, धुळे) यांना विकास पाटील याने नाशिकच्या मुलीचे स्थळ सुचविले. त्यानुसार २४ जानेवारी रोजी नाशिक येथे मुलगी पसंतीचा कार्यक्रम झाला. सीमा पवार या बनावट वधूबरोबर न्यायालयात सर्वांसमक्ष विवाह करारनामा झाला. यावेळी मुलीचे बनावट पालक उपस्थित होते. त्यांना धुमधडाक्यात विवाह लावून देण्यासाठी दोन लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर सीमा आणि तिची बहीण वराकडील घरी गेले. दुसर्या दिवशी सकाळीच सीमाची बहीण घरातून निघून गेली. सीमानेही बनाव करुन बहिणीला आणून देण्यासाठी थोतांड रचले. त्याचवेळी सीमाचे बनावट तीन नातेवाईक नकाणे गावात आले. त्यांनी सीमाच्या बहिणीला आणून देण्यासाठी शंकरला धमकावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वास्तविक सीमाची बहीण नकाणे गावातच लपून बसली होती. हा सर्व प्रकार पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात पोहोचला. नकाणे गावातील लोकांनी बनावट वधू, तिची बहीण, दोन नातेवाईक यांना पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच बनावट वधू सीमाने आपले मूळ नाव गिता राठोड (१९, रा. सावरगाव ता. मानोरा जि.वाशिम) असे सांगितले. तसेच दुसर्या मुलीने तिचे नाव दीक्षा मोहोड (१९, रा.पयसमंडळ ,नांदगाव, अमरावती) असे सांगितले. तिघा मुलांनी त्यांची नावे अरविंद राठोड (३०, रा.दिग्रस जि.यवतमाळ), प्रवीण पटोळे (३५, रा.वडगाव, कारंजा, वाशिम), पवन चातुरकर (३०, रा. दापोरा, कांरजा,वाशिम) असे सांगितले. दरम्यान वरील पाचही जणांसह विकास पाटील (३०, रा.ढांडरे ता.धुळे), माधव वाघ (मालेगाव, जि.नाशिक), कौशाबाई पवार आणि एक मुलगी, अशा नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.