अविश्वास प्रस्ताव आणि नाशिककरांची भूमिका

ज्या नाशिककरांच्या मतांवर भाजपने बहुमत मिळवले, त्या सर्वसामान्य नागरिकांना या प्रस्तावाबाबत काय वाटते, त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत..

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजपने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मागे घेतला असला तरी, त्यासंदर्भात शनिवारच्या सभेत माहिती दिली जाईल. मुंढे यांना हटविण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. ज्या नाशिककरांच्या मतांवर भाजपने बहुमत मिळवले, त्या सर्वसामान्य नागरिकांना या प्रस्तावाबाबत काय वाटते, त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत..

करवाढ गरजेची, पण..

दर्शनी आंबेकर (गृहिणी)

जनता आणि लोकप्रतिनिधी यांची नाळ जोडलेली असते. त्यांनीच लोकप्रतिनिधी निवडून दिलेला असतो. आज उलट चित्र दिसत आहे. केवळ आयुक्त आणि लोकप्रतिनिधी विरोधात नसून लोकप्रतिनिधी आणि काही टक्के शहरवासीय यांच्यातही मतभेद दिसत आहे. त्याचे कारण काय तर नियमबध्द, कर्तव्यदक्ष, कायद्याच्या चौकटीत कार्य करणारा, प्रशासकीय अधिकारी आयुक्त तुकाराम मुंढे. त्यांनी अतिशय जलदगतीने नाशिकमध्ये विकास कामे सुरू केली. आज पुणे, मुंबईसारख्या शहरांच्या तुलनेत नाशिकचा खूप विकास होणे गरजेचे आहे. पालिकेला विकास कामे करण्यासाठी करवाढ आवश्यक असली आणि गेल्या दोन दशकात ती झालेली नसली तरी अचानकपणे अनेक पटीने ती वाढविणे देखील सर्वसामान्य जनतेसाठी अवघड असेल. याचा योग्य तो विचार व्हायला हवा. केवळ करवाढ हा मुद्दा विचारात न घेता मुंढे यांनी इ कनेक्ट अ‍ॅपद्वारे तक्रारी नोंद आणि योग्य न्याय, कचरा प्रश्न, कर्मचारी शिस्त, अतिक्रमणे यासारखे महत्वाचे निर्णय घेतले. प्रशासकीय कामांना गती मिळाली. त्यामुळे मुंढे यांच्या कृतीत योग्यता वाटते. नियमबाह्य़ पध्दतीने कामे करणारे कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे अधिकारी मिळाले हे आपल्या नाशिकसाठी चांगलेच आहे. शासकीय अधिकारी-लोकप्रतिनिधी यांचा जर शहर विकास हा समान हेतू आहे, तर ते एकाच व्यासपीठावर असायला हवे. राजकीय पक्षांचे कुठेतरी नुकसान होत असावे म्हणून ते आयुक्तांच्या विरोधात उभे आहेत असे सर्वसामान्यांना वाटते. मी नाशिककर आणि नाशिक माझे असे प्रत्येकाने समजले तर नाशिकचा विकास, स्मार्ट सिटी ही गोष्ट लवकर वास्तवात येईल. समर्थन किंवा असमर्थन यापेक्षा सुव्यवस्था, सोयी सुविधा हा विषय सर्वसामान्यांना महत्वाचा वाटतो. याच गोष्टीवर मुंढेंनी काही महिन्यात काम करून दाखविले तरी राजकीय मंडळी विरोधात का जातात, ही विचार करण्याची बाब आहे. थोडक्यात निर्णय काहीही असला तरी नागरिकांना तो स्वीकारावाच लागणार हे वास्तव आहे.

विकासाला नवा आयाम

वैशाली देशपांडे

महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर सात महिन्यांत झालेले विलक्षण बदल लक्षात येतात. मुंढे येण्याआधी पालिकेचा कारभार यथातथाच होता. सर्वसामान्य नागरिक प्रामाणिकपणे कर भरतो. त्या बदल्यात त्यांना मूलभूत सुविधा पुरविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. हा मुद्दा ते आल्यानंतर सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने ज्ञात झाला. स्वच्छतेची कामे नियमितपणे होत आहेत. शहरात भ्रमंती करताना सर्वत्र मार्ग फलक लागलेले दिसतात.

कधीतरी येणारे नातेवाईक देखील हे बदल आवर्जुन कथन करतात. नाशिकला मुंढे यांच्यासारख्या मेहनती, प्रामाणिक, शिस्तप्रिय अधिकाऱ्यांची गरज आहे. पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांनी शिस्त लावली. यामुळे नागरिकांची कामे सहजपणे होत आहेत. ऑनलाईन तक्रारीच्या सुविधेमुळे पालिकेत जावे लागत नाही. भ्रमणध्वनीवरून नोंदविलेल्या तक्रारीची तत्परतेने दखल घेतली जाते. तिची सोडवणूक केली जाते. हे प्रथमच घडत आहे. सर्वसामान्यांना ते जाणवत आहे.

घराघरातील कचरा संकलीत करणाऱ्या घंटागाडीची व्यवस्था अनेकदा वादात असते. नियमितपणे घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी काही भागातून नेहमी होतात. मागील सात महिन्यात कचरा संकलनाची व्यवस्था विनातक्रार सुरू असल्याचे लक्षात येते. प्रशासन प्रमुख म्हणून मुंढे हे चांगले काम करीत आहेत. नाशिकच्या विकासाला नवा आयाम देण्यासाठी त्यांची गरज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Non confidence motion and role of nashik

ताज्या बातम्या